कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही चित्रपट तिकिटांच्या किमतींवर मर्यादा हवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:07 IST2025-08-05T17:07:06+5:302025-08-05T17:07:39+5:30
धोरणात्मक पावले उचलण्याच्या मागणीला जोर

संग्रहित छाया
कोल्हापूर : कर्नाटक सरकारने चित्रपट तिकिटांच्या किमती २०० रुपयांपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, महाराष्ट्रातही अशीच धोरणात्मक पावले उचलावी, अशी मागणी जोर धरत आहे, विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी याला पाठबळ दिले आहे.
सध्या महाराष्ट्रातील तिकीट किमती खूपच बदलत्या आहेत. एकल-स्क्रीन थिएटरमध्ये साधारण १५० पासून ४०० रुपये आणि मल्टिप्लेक्समध्ये १२०० रुपयांपर्यंत याचे दर आहेत. चित्रपट उद्योगातील लोकांच्या मते, या जास्त किमतींमुळे नियमित चित्रपट प्रेक्षक सिनेमागृहात येत नाहीत.
मराठी चित्रपट निर्माता, कलाकार आणि सांस्कृतिक संघटनेने महाराष्ट्र सरकारला कर्नाटकप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. मराठी चित्रपटांचे प्रदर्शन आणि व्यावसायिक यश वाढवण्यासाठी तिकिटांच्या किमती कमी केल्याने मदत होईल, असा विश्वास आहे.
कर्नाटक सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रानेही तिकीट किमती कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळण्यासाठी आणि प्राइम टाइममध्ये वेळ मिळावी, यासाठी नियम करणे आवश्यक आहेत. - स्वप्नील राजशेखर, अभिनेता.
मनोरंजन क्षेत्रात सरकारने हस्तक्षेप करावा. तिकीट किमती नियंत्रित कराव्यात आणि मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्यावे. - अजय कुरणे, दिग्दर्शक.
राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास मराठी प्रेक्षक प्रादेशिक चित्रपटांकडे आकर्षित होतील आणि प्रेक्षक संख्या वाढेल. -सागर तळाशीकर, अभिनेता.
नियमबद्ध किंमत प्रणाली आणि स्क्रीन वेळ वाटप सुनिश्चित करणारा अधिकारसंपन्न कायदाही अस्तित्त्वात आला तर मराठी चित्रपटाच्या प्रगतीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. - अभिराम भडकमकर, लेखक-अभिनेता.
सध्या महाराष्ट्रातील तिकीट किमती विविध आहेत आणि कर्नाटकच्या २०० रुपयांच्या किमतीच्या मर्यादेनंतर महाराष्ट्रातही अशाच धोरणाची गरज आहे. मराठी चित्रपटांसाठी स्क्रीन आणि वेळ यांचे नियम निश्चित असावेत. यामुळे त्यांचा व्यावसायिक विकास होईल. - आनंद काळे, अभिनेता.