कोल्हापूरमधील मंदिरातील हत्तीण ‘महादेवी’ (म्हणजेच माधुरी) हिच्या स्थलांतरावरून सुरू असलेल्या चर्चांना आता एका संवेदनशील वळण मिळालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे वंताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली की, वंताराने महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराला पूर्ण पाठिंबा दिला आहे. "महादेवी हत्तीला (माधुरीला) नांदणी मठात सुरक्षित परत नेण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल करणार आहे, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वंताराने घेतला आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.
वंताराचे अधिकारी म्हणाले की, 'आम्ही कोर्टाच्या आदेशानुसारच काम केलं असून, हत्तीला कायमस्वरूपी ठेवण्याचा कुठलाही हेतू नव्हता. कोर्टाने सांगितलेली वैद्यकीय मदत, हत्तीचे पुनर्वसन आणि संपूर्ण आरोग्यविषयक काळजी हाच त्यांचा उद्देश होता.'
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटमध्ये पुढे सांगितलं की, "कोल्हापूर जिल्ह्यात, नांदणी मठाजवळ, वनविभाग जिथे जागा निश्चित करेल, तिथे महादेवीसाठी एक पुनर्वसन केंद्र उभारण्यात वंताराचे संपूर्ण सहकार्य मिळेल."
या निर्णयातून वंताराने एक बाजूला कायदेशीर जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरच्या जनतेच्या भावनादेखील समजून घेतल्या.
माधुरीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाच केंद्रस्थानी ठेवून, सार्वजनिक भावना आणि जनतेचा सन्मान करत, वंताराने एक विलक्षण मार्ग शोधला आहे. हा निर्णय एकीकडे कोल्हापूरकरांना मानसिक समाधान देतो, आणि दुसरीकडे महादेवीला एक प्रेमळ, सुरक्षित आणि सन्मानाचं आयुष्य देतो.