शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:09 IST2025-10-29T19:08:58+5:302025-10-29T19:09:32+5:30
देवेंद्र फडणवीस तुमचा बिस्तारा नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असा इशारा जानकरांनी दिला.

शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
नागपूर - राज्यातील महायुती सरकारविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला आहे. या मोर्चात प्रमुख शेतकरी नेते सहभागी झालेत. त्यात माजी मंत्री महादेव जानकर यांनी आक्रमक भाषण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार..जेलमध्येही जायला आम्ही तयार आहोत पण मागे हटणार नाही असा इशाराच त्यांनी मोर्चातून सरकारला दिला.
महादेव जानकर म्हणाले की, सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांना शांत बसू देणार नाही. महाराष्ट्रात आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरू. आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतोय, तो कुणाला दिसत नाही. जनता कोर्ट आहे. जोपर्यंत नेते सांगत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. महाराष्ट्रातील एकही जेलमध्ये रिकामे ठेवणार नाही. आमच्या माणसांना घेऊन जावा, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. सरकार मागे हटतंय की आम्ही हटतोय हे आम्हाला बघायचे आहे. देवेंद्र फडणवीस तुमचा बिस्तारा नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
तर पोलिसांनी कोर्टाचा आदेश आपल्याला आणून दिला. सहा वाजायच्या आत रस्ता रिकामा करा असा आदेश दिलाय. आदेश देणाऱ्यांना इंग्रजांनी काढलंय का हे आम्हाला माहिती नाही. आदेश देताना संदर्भ एका इंग्रजी पेपरचा घेतलेला आहे. एकाबाजूने सरकार चर्चेस तयार आहे असं सांगते, दुसऱ्या बाजूला कोर्टाची ऑर्डर येते. शिखंडीचा डाव सरकारमधील कुणी खेळत असेल तर त्यांच्या कमरेला चड्डीही शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवावे. आम्ही संविधानाचा आदर करतो पण न्यायव्यवस्थेनेही जबाबदारीने वागले पाहिजे असं जबाबदार नागरीक म्हणून सांगतोय. न्यायव्यवस्था भरकट चाललीय का असा प्रश्न निर्माण होतो. भविष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतात. आम्ही दोन्ही हात वर करून सरेंडर व्हायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला जेलमध्ये घेऊन जा असं आव्हान शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिले.
दरम्यान, आंदोलन आता संपले नाही, असेच सुरू राहणार आहे. मैदान कुणीही सोडणार नाही. पाठ दाखवून कुणी जायचे नाही. कोर्टालाही निर्णय देताना जाण झाली पाहिजे. आजही आम्ही न्याय व्यवस्थेचा आदर करतो. पण न्याय व्यवस्था अशीच पुढे राहिली तर कोर्टासमोर आंदोलन उभं करावे लागेल. रोज शेतकरी मरतायेत त्यावर कुणी बोलत नाही. ज्या ताकदीने पोलीस येतील, त्या ताकदीने आम्ही शरण जाऊ. पोलिसांनी आम्हाला अटक करून दाखवावी असं बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला.