माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:55 IST2025-05-06T15:54:54+5:302025-05-06T15:55:54+5:30
महादेव जानकर यांनी आता काँग्रेससोबत जाण्यासाठी तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
Mahadev Jankar News: भाजपाने आम्हाला विचारले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यावर भाजपाला छोट्या पक्षांची गरज नाही. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला पाहिजे, हा विचार केला. राहुल गांधी यांनी पक्ष कार्यालयात बोलावले नाही, घरी बोलवले होते. मला सन्मानाची वागणूक दिली. राहुल गांधी सोबत जनगणना बाबत चर्चा झाली. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात महायुतीत धुसपूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट चांगलेच नाराज झाले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात पुन्हा एकदा खटके उडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता महादेव जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीसोबत असलेले महादेव जानकर इंडिया आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची महादेव जानकर यांनी भेट घेतली. या भेटीबाबत महादेव जानकर यांनी पत्रकारांना माहिती दिली.
तेजस्वी यादव, शरद पवारांना भेटणार
अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली. यापुढे स्टॅलिन, शरद पवार, तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार आहे. माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे, असे जानकर यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, त्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करायचे आश्वासन दिले होते, ते पाळले गेले पाहिजे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समाविष्ट करावा आणि मराठा आरक्षण द्यावे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना बंद करू नये, असे जानकर म्हणाले.
दरम्यान, माझ्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत. मोठा पक्ष छोट्याला दाबतो, त्याचा अनुभव त्यांना येईल. आमच्यासाठी भाजपाने दार बंद केली आहे. आमची काही चूक नाही, अशी खंत जानकर यांनी बोलून दाखवली. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास अघाडीत असलेले महादेव जानकर महायुतीत आले होते. त्यानंतर महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा निवडणुकीत उतरवले होते. परंतु मविआचे उमदेवार संजय जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. महायुती सत्तेत आल्यानंतर त्यांना सत्तेत काही स्थान मिळाले नाही.