भारत चव्हाण,
मुंबई- महाड पोलदपूर दरम्यान महापूराच्या पाण्यात ब्रिटीशकालीन पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. याच दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तीन तज्ज्ञांची एक समिती गठीत केली असून या समितीने कारणांचा शोध घेण्याचे काम सुरु केले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.बुधवारी न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती, परंतु सरकारने ती मान्य केली नव्हती. गुरुवारी मात्र प्रश्नोत्तराचा तास संपताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय सभागृहात पुन्हा आणला. महाडजवळील दुर्घटनेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे, कारण ही दुर्घटना केवळ मंत्री, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडलेली आहे. त्याची जबाबदारी निश्चित होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी विखे पाटील यांनी केली. न्यायालयीन चौकशीची मागणी योग्य असून ती मान्य करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, बुधवारीच राज्य सरकारने आयआयटी संस्थेचे प्रा. ज्योतिप्रकाश, आर.एच.जहॉँगिर व व्ही. एस.वासुदेव अशा तीन तज्ज्ञांची समिती नेमली आहे. सरकारने राज्यातील सर्वच ब्रिटीशकालीन जुन्या पूलांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचा निर्णय घेतला असून तसे निर्देश विभागीय बांधकाम अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र ही प्रक्रिया बराच वेळ चालणार असल्याने तातडीने प्राथमिक आॅडीट करून हे पूल वाहतुकीस योग्य आहेत की नाही याची माहितीघेण्यात येईल. >तर दुर्घटना टळली असती : अजित पवारस्थगन प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी महाड जवळील ब्रिटीशकालीन पूल धोकादायक बनला असल्याचा विषय भारतकुमार गागावले यांनी ३० जुलै २०१५ रोजी विधानसभेत उपस्थित केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा पूल सक्षम असून वाहतुकीस योग्य असल्याचे सांगितले होते. हा मंत्री, अधिकारी याचा दुर्लक्षपणा आहे.त्यामुळे संबंधित अधिकारी मंत्र्यांना शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे पवार म्हणाले. स्ट्रक्चरल आॅडीटचा मुद्दा पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांनीही उचलून धरला.>कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पूल तसेच आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील पूलही धोकादायक बनल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. शिवाजी पूलाला पर्यायी पूल तयार केला जात असून त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी सूृचना क्षीरसागर यांनी केली.