Vidhan Sabha Election: 'मविआ'चं टेन्शन वाढवणारी आकडेवारी! विधानसभेला बसू शकतो झटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:59 IST2024-08-23T17:36:33+5:302024-08-23T17:59:49+5:30
Maharashtra Vidhan Sabha election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी सुरू असतानाच एका सर्व्हेने महाविकास आघाडीच्या चिंतेत भर टाकली आहे.

Vidhan Sabha Election: 'मविआ'चं टेन्शन वाढवणारी आकडेवारी! विधानसभेला बसू शकतो झटका?
Maharashtra Assembly Election 2024 Opinion Poll: लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, तर महायुतीला जबर फटका बसला. पण, आगामी विधानसभा निवडणुकीआधी समोर आलेल्या सर्व्हेच्या आकडेवारीने मविआची चिंता वाढवली आहे. मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये महत्त्वाची मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीपेक्षा महाविकास आघाडीची कामगिरी चांगली राहिली. महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला जबर फटका बसला होता. दुसरीकडे मविआमधील काँग्रेसने मुसंडी मारली. पण, नव्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील मतदारांचा कल आता बदलला आहे. आजघडीला लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप आणि काँग्रेसच्या तीन जागा वाढतील, असा या सर्व्हेत म्हटले आहे.
महाविकास आघाडीसाठी कोणती बाब चिंतेची?
या सर्व्हेतील आकडेवारीनुसार, महाविकास आघाडीच्या कामगिरीवर समाधानी असलेल्या लोकांपेक्षा असमाधानी असलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. मविआच्या कामावर ११ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर २१ टक्के लोक थोडे अधिक समाधानी आहेत. मात्र, ३० टक्के लोकांनी महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी नसल्याचे मत नोंदवले आहेत.
महायुती सरकारच्या कामावर किती टक्के लोक समाधानी?
महायुती सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे २५ टक्के लोकांनी म्हटले आहे. तर ३५ टक्के लोक थोडे जास्त समाधानी आहेत. ३० टक्के लोकांनी मात्र महायुती सरकारच्या कामावर समाधानी नसल्याचे म्हटले आहे.