महाआघाडी सरकार शेतकऱ्यांना दोन टप्प्यात देणार कर्जमाफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 05:33 IST2019-12-18T05:32:51+5:302019-12-18T05:33:08+5:30
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले.

महाआघाडी सरकार शेतकऱ्यांना दोन टप्प्यात देणार कर्जमाफी
अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात कर्जमाफी देण्याची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. त्यासाठी पहिला टप्पा आर्थिक वर्ष संपण्याच्या आत तर दुसरा टप्पा १ एप्रिल २०२० नंतर पूर्ण केला जाईल. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे विश्वसनीय सुत्रांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नागपुरात येताच जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मालिक, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा विषय निघाला. त्यावर सविस्तर चर्चा झाली. तत्पूर्वी अजित पवार यांनी वित्त विभागाच्या अधिकाºयांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली. कर्जमाफीसाठी किती पैसे लागतील, याचा अंदाज घेण्यात आला. तसेच विविध बँकांकडून शेतकºयांकडील कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले. कर्जमाफीचा आकडा साठ हजार कोटीवर आला. त्यापैकी काही कर्ज फडणवीस सरकारने माफ केले होते. या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार नाही. मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात कर्जमाफीची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले. राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी द्यायची आणि शेतकºयांना चिंतामुक्त करायचे, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केली आहे.