म:हाटमोळ्या कोल्हापुरात उरले मोजकेच कासार
By Admin | Updated: July 10, 2014 01:15 IST2014-07-10T01:15:25+5:302014-07-10T01:15:25+5:30
सौभाग्यालंकार असलेल्या बांगडय़ांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही जात असो वा धर्म; प्रत्येक स्त्रीच्या हातात काचेच्या बांगडय़ा असतात.

म:हाटमोळ्या कोल्हापुरात उरले मोजकेच कासार
इंदुमती गणोश - कोल्हापूर
सौभाग्यालंकार असलेल्या बांगडय़ांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही जात असो वा धर्म; प्रत्येक स्त्रीच्या हातात काचेच्या बांगडय़ा असतात. मात्र कमी उत्पन्न, नाजूक वस्तू असल्याने नुकसानीची सर्वाधिक शक्यता आणि समाजात नसलेला मानसन्मान यामुळे पारंपरिक पद्धतीने बांगडय़ांचा व्यवसाय करीत असलेल्या कुटुंबांतील नवी पिढी या व्यवसायात येण्यास उत्सुक नाही.
कोणत्याही स्त्रीसाठी बांगडी हा सौंदर्यालंकारातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. शिवाय हा अलंकार सौभाग्याशी जोडलेला असल्याने त्याबद्दल स्त्रियांमध्ये अत्यंत हळव्या भावना असतात. काही वर्षापूर्वीर्पयत केवळ काचेच्या कचकडी या प्रकारातील बांगडय़ाच आपल्याला माहीत होत्या. आता मात्र काचेमध्ये रंगीबेरंगी, प्लेन असे प्रकार आहेत. अगदी साडेतीन रुपयांपासून ते 15 रुपयांर्पयत एका बांगडीचा दर आहे. या व्यवसायातून वर्षाकाठी कोल्हापुरात चार कोटींच्या आसपास उलाढाल होते. कोल्हापूरमध्ये काचेच्या बांगडय़ा वापरणा:या महिलांचे प्रमाण जास्त आहे. या महिला शहरातील किरकोळ दुकानदारांकडे जाऊन बांगडय़ा घालतात. शहरात घाऊक पद्धतीने हा व्यवसाय करणा:यांची संख्या मोजून सात आहे. त्यातही दोन-तीन व्यावसायिकांचे उत्पन्न अत्यल्प आहे.
या घाऊक व्यापा:यांकडून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागांतील किरकोळ विक्रेत्यांकडे बांगडय़ा पाठविल्या जातात. हा व्यवसाय मुख्यत: मुस्लीम, जैन समाजातील नागरिकांकडून केला जातो.
स्पर्धा मेटल, इमिटेशन, प्लास्टिक बांगडय़ांशी.. पूर्वी फक्त काचेच्याच बांगडय़ा प्रचलित होत्या. त्या अतिशय नाजूक असल्याने व सांभाळून ठेवण्याचाच प्रश्न अधिक असल्याने आता मेटल आणि प्लास्टिकच्या बांगडय़ांना तरुण मुली व महिलांमधून अधिक मागणी आहे. जुन्या पिढीतील महिला कायमस्वरूपी काचेच्या बांगडय़ा वापरतात. मेटल-प्लास्टिकमध्येही खडय़ांचे वर्क केलेले, इमिटेशन बांगडय़ा, पार्टीवेअर, फॅन्सी, प्लेन, बालिका वधू, मधुबाला, विद्या बालन पॅटर्न अशा अनेक प्रकारच्या बांगडय़ा बाजारात उपलब्ध आहेत, ज्या दिल्ली, मुंबई, पुण्याहून आणल्या जातात.
कोल्हापुरात आम्ही मोजके लोकच बांगडी उद्योगात आहोत. शहरात बांगडी व्यवसायाला करातून वगळले आहे, पण कोल्हापुरात तशी सूट नाही. या व्यवसायात फारसे उत्पन्न नसल्याने नवी पिढी यात यायला तयार नाही, अशी हताशता अगरवाल बॅँगल्सचे ओमप्रकाश अगरवाल व्यक्त करतात.
नुकसानीचा फटका सर्वानाच : देशात काचेच्या बांगडय़ांची निर्मिती फिरोजाबाद या एकाच शहरात केली जाते. येथून या बांगडय़ा सर्व राज्यांत पाठविल्या जातात. स्थानिक घाऊक व्यावसायिकांच्या मागणीनुसार हा माल ट्रकमधून एकत्रच पाठवला जातो. या प्रवासात तसेच घाऊक व्यावसायिकांकडून किरकोळ विक्रेत्यांकडे बांगडय़ा पाठविताना त्या फुटण्याची शक्यता सर्वाधिकअसते. बांगडय़ा हातात चढवितानाही खूप फुटतात. या नुकसानीसाठी विमाही नसल्याने तो घाऊक विक्रेत्यांपासून ते कासारार्पयत सगळ्याच विक्रेत्यांना सोसावा लागतो.
कासार पद्धती उरली ग्रामीण भागातच.. पूर्वी कासार सायकलीवर बांगडय़ांची पिशवी घेऊन गल्लोगल्लीतून फिरत असे. त्यामुळे घरोघरी जाऊन बांगडय़ा भरण्याची पद्धत होती. ही कासार पद्धती आता गावात असली तरी शहरांमधून हद्दपार झाली आहे. अगदीच घरात काही कार्यक्रम असला किंवा लग्नकार्य असले तरच कासार महिलेला घरी बोलवले जाते.