उल्हासनगरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये घबराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:07 IST2026-03-27T17:07:06+5:302026-03-27T17:07:55+5:30
Ulhasnagar Fuel Crisis: गेल्या दोन दिवसांपासून उल्हासनगर शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

उल्हासनगरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये घबराट!
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर: गेल्या दोन दिवसांपासून उल्हासनगर शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याच्या चर्चेने, घाबरलेल्या नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पंपांवर एकच गर्दी केली आहे. विशेष म्हणजे पंप मालकांकडून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे वारंवार सांगण्यात येत असूनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र आहे.
उल्हासनगरातील व्हिनस चौक, गांधी रोड, श्रीराम चौक, काजल पेट्रोल पंप, १७ सेक्शन, हिराघाट पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनांनी रस्ते व्यापले असून, यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील निर्माण होत आहे. दुपारच्या कडाक्याचा उन्हात नागरिक अर्धा ते एक तास रांगेत उभे राहून आपल्या गाड्यांच्या टाक्या पूर्ण भरून घेत आहेत. पुढील काही दिवस पेट्रोल मिळणार नाही, अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने ही भीती पसरल्याचे बोलले जात आहे.
पंप मालकांचे आवाहन निष्फळ
पेट्रोल पंप मालकांनी स्पष्ट केले आहे की, इंधनाचा तुटवडा नाही आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, तरीही नागरिक घाबरून खरेदी करीत आहेत. यामुळे विनाकारण गर्दीचा ताण पेट्रोल पंप यंत्रणेवर येत आहे.
अफवांचे पीक
पेट्रोल व डिझेल पुरवठा काही दिवसात बंद होणार असल्याच्या अफवेमुळे भीतीचे वातावरण गाडी चालकात निर्माण झाले. या अफवेमुळे गाडी चालक पेट्रोल व डिझेलचा साठा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजकीय नेत्यांचा पुढाकार
शहरातील विविध पक्षाचे नेते सोशल मीडियावर नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता गरजेनुसारच इंधन भरावे, जेणेकरून विनाकारण होणारी गर्दी आणि उन्हातील त्रास टाळता येईल. असे आवाहन करीत आहेत.