वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:49 IST2025-08-31T12:47:43+5:302025-08-31T12:49:07+5:30
Mumbai Traffic: आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईत येत असल्यामुळे शनिवारी सकाळीही वाशी खाडीपुलावर चक्काजाम झाला.

वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईत येत असल्यामुळे शनिवारी सकाळीही वाशी खाडीपुलावर चक्काजाम झाला हाेता. मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना नवी मुंबईत वाहने थांबवून रेल्वेने येण्याचे आवाहन केले. तसेच मुंबईतील अवजड वाहनांची वाहतूकही थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सायन-पनवेल महामार्गावर शनिवारी पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी वाढली होती. सकाळी नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमध्ये आंदोलकांच्या वाहनांची भर पडल्यामुळे कोंडी झाली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जास्त कुमक तैनात केली.
मुंबईच्या हद्दीत मानखुर्द जकात नाक्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी आंदोलकांची वाहने अडवून पुन्हा नवी मुंबईत पाठविण्यास सुरुवात केल्यामुळे वाहतूक कोंडीत काहीवेळ भर पडली होती. जवळपास तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली. आंदोलकांनी वाहने मुंबईत घेऊन जावू नये. वाहने नवी मुंबईत उभी करून रेल्वेने आझाद मैदानावर पोहचावे, असे आवाहन केले आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांधकाम साहित्य घेउन जाणारे डंपर व इतर अवजड वाहनांना वाशी खाडी पुलावरून प्रवेश बंद केला आहे. अवजड वाहतूक बंद केल्यामुळे ही वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
२४ तास बंदोबस्त
नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाशी खाडीपुलासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यालय व इतर ठिकाणचे कर्मचारी वाशी वाहतूक विभागाकडे वळविण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी चोवीस तास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही वाहतूक पोलिसांनी दिली.