LMOTY 2019: घरी कोण बॉस, कोण डिसिजन मेकर; सांगताहेत फडणवीसांच्या होम मिनिस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:40 IST2019-02-20T23:01:04+5:302019-02-21T16:40:39+5:30
मिस्टर आणि मिसेस फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत

LMOTY 2019: घरी कोण बॉस, कोण डिसिजन मेकर; सांगताहेत फडणवीसांच्या होम मिनिस्टर
मुंबई: माणूस घराबाहेर कोणीही असला, कितीही मोठा असला, तरी घरात बायकोशी भांडण झाल्यावर नवऱ्यालाच सॉरी म्हणावं लागतं, असा घरगुती किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. अभिनेता रितेश देशमुखनं लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात या दोघांनी अनेक गोष्टींवर अगदी दिलखुलासपणे भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मात्र घरात कोणाचा दरारा अधिक आहे, असा प्रश्न रितेशनं विचारला. यावर घरात ते बॉस आहेत. पण मी डिसिजन मेकर आहे, असं स्मार्ट उत्तर अमृता यांनी दिलं. यानंतर तुम्हाला आता कळलंच असेल, मी काय भोगतो आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विशेष म्हणजे कार्यक्रमाला हजर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील यांनाही हसू आवरता आलं नाही. देवेंद्र फडणवीस किती रोमँटिक आहेत, असा प्रश्नही यावेळी मिसेस चीफ मिनिस्टरना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र यांना काहीच माहित नसतं. मी नवा ड्रेस घातला आहे. जाड झाले आहे, बारीक झाली आहे का, याकडे त्यांचं लक्षच नसतं, अशी तक्रार अमृता यांनी केली.
देवेंद्र यांचं अपहरण करुन त्यांना कुठे घेऊन जाल, असा प्रश्न रितेशनं अमृता यांना विचारला. या प्रश्नाला तुमच्याच घरी आणेन. नवरा बायको एकमेकांशी कसे वागतात हे त्यांना कळेल, असं उत्तर अमृता यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी झाल्यानंतर तुम्ही प्रकाशझोतात आलात, असं वाटतं का, असं रितेश देशमुखनं विचारताच मी आधीही काम करत होते, मात्र प्रकाशझोतात आता आले. आता जितकं कौतुक होतं, तितकीच टीकादेखील होते, अशी मन की बात अमृता यांनी सांगितली.
लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इयर 2019 सोहळा आज वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये संपन्न झाला. या सोहळ्याचं हे सहावं वर्ष होतं. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांचा या सोहळ्याच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.