दोन उपमुख्यमंत्र्यांची 'महामुलाखत'; 'लोकमत'च्या सोहळ्यात फडणवीस-पवार एकत्र प्रश्नांना सामोरे जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 19:12 IST2024-02-13T19:11:54+5:302024-02-13T19:12:52+5:30
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स सोहळ्यातील 'महामुलाखती' कायमच गाजल्यात, चर्चेचा विषय ठरल्यात. यावर्षी या सोहळ्यात महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री - म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्र मुलाखत होणार आहे.

दोन उपमुख्यमंत्र्यांची 'महामुलाखत'; 'लोकमत'च्या सोहळ्यात फडणवीस-पवार एकत्र प्रश्नांना सामोरे जाणार
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. महाराष्ट्राच्या भूमीशी ज्यांनी रक्ताचं आणि घामाचं नातं जोडलं, ज्यांनी आपलं आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचलं अशा महाराष्ट्रीयांचा सन्मान करणारा हा सोहळा दरवर्षी खास असतो. या सोहळ्यातील 'महामुलाखती' कायमच गाजल्यात, चर्चेचा विषय ठरल्यात. तोच सिलसिला यावर्षीही कायम राहणार आहे. कारण, महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री - म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पहिल्यांदाच एकत्र मुलाखत होणार आहे.
गेल्या वर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'च्या भव्य सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महामुलाखत झाली होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना काही टोकदार सवाल केले होते. त्याला राज यांनी ठाकरी शैलीत 'खळ्ळ-खटॅक' उत्तरं दिली होती. त्यासोबतच, अमृता फडणवीस यांच्या खुमासदार प्रश्नांवरही राज यांनी धम्माल 'बॅटिंग' केली होती. या मुलाखतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर आजही व्हायरल होतात.
त्याचप्रमाणे, २०२२ चा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळा एका अभूतपूर्व मुलाखतीने गाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत 'नटसम्राट' नाना पाटेकरांनी घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्रात मोठं सत्तानाट्य घडलं होतं आणि जनतेच्या मनात अनेक प्रश्न होते. ते नानांनी थेट शिंदे-फडणवीसांना विचारले होते. त्यातल्या बऱ्याच प्रश्नांवर हजरजबाबी जोडीनं बाजी मारली, पण काही प्रश्नांना उत्तरं देणं त्यांनाही थोडं जड गेलं होतं.
या दोन महामुलाखती पाहता, यावर्षी दोन उपमुख्यमंत्र्यांची मुलाखतही चांगलीच रंगतदार होईल, याबद्दल शंकाच नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही मुरब्बी, अनुभवी आणि अभ्यासू नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यामुळे 'गुगली' किंवा 'बाउन्सर' प्रश्नांचा ते एकत्र सामना कसा करतात, 'फ्रंट फुट'वर खेळतात की 'डिफेन्स'चा आधार घेतात, पडद्यामागचे काही किस्से सांगतात की काही नवे गौप्यस्फोटच करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही महामुलाखत १५ फेब्रुवारीला सायंकाळी मुंबईत होणार आहे.