लोकांचे काम पाहिले आणि सगळेच विजेते वाटू लागले...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:49 IST2025-03-17T09:46:55+5:302025-03-17T09:49:44+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Award : सकारात्मकतेचा प्रसार करण्याचे काम लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार करत आहे - ज्युरी मंडळाच्या प्रतिक्रिया

लोकांचे काम पाहिले आणि सगळेच विजेते वाटू लागले...!
मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा केवळ एक पुरस्कार नाही, तर समाजात प्रेरणादायी आणि सकारात्मकतेचा प्रसार करणारे ते एक लोकहिताचे कार्य आहे,’ असा सूर लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या परीक्षक मंडळाच्या बैठकीत मान्यवर परीक्षकांनी व्यक्त केला.
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ची ज्युरी मीटिंग उत्साहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल होते. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी प्रत्येक कॅटेगरीसाठी नॉमिनीची निवड कशा पद्धतीने केली जाते, याची माहिती दिली. वेगवेगळ्या क्षेत्रांतील गुणवंतांना सगळ्यांत आधी ‘लोकमत’ने शोधले आणि नंतर त्यांना वेगवेगळ्या स्तरांवरचे पुरस्कार मिळाले याची अनेक उदाहरणे यावेळी ऋषी दर्डा यांनी दिली. प्रत्येक कॅटेगरीवर चर्चा होऊन विजेत्यांची निवड केली गेली. चार तास ही बैठक सुरू होती. वाचकांनी केलेल्या मतदानाची आकडेवारी ज्युरींना देण्यात आली.
परीक्षक मंडळात काम करताना मला अतिशय आनंद झाला. अतिशय सार्थ चर्चा झाली. काही मुद्द्यांवर एकमत तर काही मुद्द्यांवर बहुमत होते, पण चर्चा सकस झाली. ज्या उमेदवारांच्या शिफारशी आल्या होत्या, त्या सर्व व्यक्ती उत्तुंग काम करत आहेत. विजेते असोत वा शिफारशी आलेल्या व्यक्ती असोत, हे सर्वच लोक महाराष्ट्राच्या विकासयात्रेत योगदान देत आहेत. या शिफारशी निवडण्यासाठी ‘लोकमत’च्या चमूने सखोल काम केले. विजय दर्डा आणि ऋषी दर्डा यांचे विशेष अभिनंदन. सर्वांना शुभेच्छा.
पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री
नकारात्मक गोष्टीपेक्षा चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक व्हावे, त्यांचा सन्मान केला जावा, म्हणून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. या पुरस्कारामुळे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांत चांगले काम करण्याची स्पर्धा निर्माण झाली हे या पुरस्काराचे मोठे यश आहे. पुरस्कारासाठी ज्यांचे नॉमिनेशन होते ते आमच्यासाठी विजेतेच असतात. त्यांच्या कामामुळे आम्हाला कायम प्रेरणा मिळत असते.
डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एरिटोरियल बोर्ड
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार बहुचर्चित आणि प्रोत्साहन देणारा आहे. अशा पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना तर प्रोत्साहन मिळतेच; पण यामुळे समाजातील इतर लोकांनादेखील यातून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. जे विजेते झाले त्यांचे तर अभिनंदन आहेच; पण ज्यांची निवड होऊ शकली नाही, त्यांनाही मी शुभेच्छा देत आहे. अत्यंत समाजोपयोगी असा हा उपक्रम राबवत असल्याबद्दल ‘लोकमत’चे विशेष अभिनंदन...!
राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
या पुरस्कारासाठी विविध श्रेणीत अनेक लोकांच्या शिफारसी आल्या होत्या. त्यामुळे परीक्षक मंडळाला त्यातून निवड करणे हे अतिशय आव्हानात्मक होते, पण ज्या लोकांच्या शिफारसी आल्या आणि त्यांचे काम पाहिल्यावर मला वाटते की, ज्या ज्या लोकांच्या शिफारसी आल्या ते सर्वच विजेते होते.
हर्ष जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक, ड्रीम-११ समूह
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या परीक्षक मंडळात मी परीक्षक म्हणून काम पाहिले. काही पुरस्कार निवडताना परीक्षक मंडळाचे तातडीने एकमत झाले, तर काही पुरस्कारांच्या निवडीसाठी मतमतांतरेदेखील झाली. मात्र, हा एक विलक्षण अनुभव होता.
मनीषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र
पोलिस दलातील अधिकारी किती चांगले काम करतात, याची माहिती अशा पुरस्कारांमुळे समाजाला मिळते. पोलिसांबद्दल समाजाच्या मनात असलेली नकारात्मकतेची भावना दूर होण्याचे काम अशा पुरस्कारामुळे होते आणि पोलिस दलात नव्याने भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अशा पुरस्कारांमुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.
मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई
पुरस्काराच्या परीक्षक मंडळाचा मी एक भाग होतो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. समाजात विविध क्षेत्रांत लोक किती वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहेत, याची जाणीव मला परीक्षक म्हणून काम करताना झाली. विजेत्यांची निवड करताना परीक्षक मंडळात साधकबाधक चर्चा झाली. मतमतांतरे झाली. त्यातून आम्ही विजेते निवडू शकलो.
नीलकंठ मिश्रा, मुख्य अर्थतज्ज्ञ, ॲक्सिस बँक
लोकमत समूहाने गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेला हा एक उत्तम उपक्रम आहे. राज्याच्या कोनाकोपऱ्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची माहिती लोकमतने आमच्यासमोर ठेवली. अनेक निकष आणि पडताळणी करून आम्ही विजेत्यांची निवड केली. ही निवड करणे इतके सोपे काम निश्चितच नव्हते.
अमित देसाई, वरिष्ठ वकील, मुंबई उच्च न्यायालय
लोकमतचा हा उपक्रमत अत्यंत स्तुत्य आहे. विविध क्षेत्रांत लोकांनी केलेल्या कामगिरीचा विचार करत परीक्षक मंडळाने विजेत्यांची निवड केली आहे. केवळ परीक्षक मंडळ नव्हे तर सर्वसामान्य जनेतेने या पुरस्कारासाठी मतदान केले. खरे परीक्षक सर्वसामान्य जनता होती.
चेतना गाला सिन्हा, संस्थापक, माणदेशी महिला सहकारी बँक
या परीक्षक मंडळात अतिशय दिग्गज लोकांचा समावेश होता. विविध पातळीवर किती प्रतिभावंत लोक काम करत आहेत, याची माहिती मला या निमित्ताने झाली. राज्याच्या विकासात या लोकांच्या कार्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या परीक्षक मंडळाचा मी एक भाग होते, हा माझा सन्मान आहे.
श्रेया घोषाल, लोकप्रिय पार्श्वगायिका
अतिशय विद्वान आणि उत्तुंग परीक्षक मंडळाचा मी एक भाग होतो, हा मी माझा बहुमान समजतो. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांत किती कमालीचे काम सुरू आहे, याची जाणीव मला झाली. चांगल्या लोकांचे चांगले काम समोर आणत लोकमतने एक सकारात्मकता पसरविण्याचे काम केले आहे, ते अतिशय विलक्षण आहे.
स्वप्निल जोशी, अभिनेता