लंडन - महिलांनी आर्थिक योगदानात स्त्री-पुरुष अशी तुलना करण्यापेक्षा भारतीय स्त्रियांमध्ये असलेल्या क्षमतेचा व्यवस्थित वापर व्हायला हवा. महिलांनी पुढे येऊन आता आर्थिक संधी साधायला हव्यात. महिलांमधील ही सुप्त क्षमता पूर्णपणे जागवली गेल्यास देशाची आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि कौटुंबीक विकासाची गतीही झपाट्याने वाढेल, असा सूर लंडन येथे आयोजित ‘लोकमत ग्लोबल इकोनॉमिक कन्व्हेंशन’मध्ये ‘भारताच्या आर्थिक विकासातील महिलांची न जोखली गेलेली सुप्त क्षमता’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला.
परिसंवादात पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भारताच्या माजी राजदूत मोनिका मोहता, बँकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, फिनोलेक्स इंडस्ट्रीच्या संचालिका रितू छाब्रिया, न्यूयॉर्क येथील पॅरामाऊंट जेम्सच्या सहसंस्थापिका रजनी जैन, आमदार श्वेता महाले, इंट्रिया ज्वेल्सच्या संस्थापिका आणि ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा कोठारी, वकील गरिमा रांका यांनी विचार मांडले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सूत्रसंचालन केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, महिलांनी फक्त प्राथमिक स्वरुपाची कामे करण्यापेक्षा सीईओ, बिझनेस डेव्हलपमेंट, राजकीय नेतृत्व अशा सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याचे लक्ष्य बाळगायला हवे. जनाना आणि मर्दाना असा भेद दूर सारून महिलांना दया नको, तर समाजाचा विश्वास हवा आहे. त्यानंतर अमृता फडणवीस, मोनिका मोहता, माधुरी मिसाळ, पूर्वा दर्डा-कोठारी, रजनी जैन, श्वेता महाले, गरिमा रांका यांनी महिलांनी आता लीडरशिप आणि ओनरशिपसाठी पुढे यावे, असे सांगितले. शेवटी, प्रा. देवयानी फरांदे यांनी आर्थिक विकासात महिलांचा केवळ सहभाग असू नये, तर त्यांची त्यातील सक्रियता जीडीपीसह विकासाला हातभार लावण्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले.