CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने विविध स्तरांवर महायुती सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात आहे. ध्रुव रिसर्च आणि लोकमत यांनी राज्यव्यापी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सरकारला पहिल्या वर्षात जनतेचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे आढळून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीबद्दलची जनता समाधानी असल्याचे सर्वेतून स्पष्टपणे दिसून आले. सर्वेनुसार राज्यातील ६५ टक्के जनता मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत समाधानी असून, विविध विभागांतूनही मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पहिल्या वर्षात राज्यात पाणीपुरवठा, रस्ते व महिला कल्याणात उल्लेखनीय प्रगती; विकास वेगात; मात्र, रोजगार आणि महागाई नियंत्रणाबाबतही वाढत्या अपेक्षा; मुख्यमंत्री फडणवीस सामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत असल्याची भावना राज्यातील जनतेने व्यक्त केली.
सामान्यांच्या हितासाठी काम करणारे मुख्यमंत्री
नुकत्याच झालेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा जनतेचा विश्वास विविध मापदंडांवर ठळकपणे दिसून आला आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्यापासून ते सुधारणांसाठी आवश्यक बदल घडवून आणण्याच्या क्षमतेपर्यंत-बहुतेक सर्व निकषांवर राज्यातील मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे. विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र येथून फडणवीस यांच्या नेतृत्वाला सर्वाधिक गुण मिळाले, तर इतरही सर्व विभागांतून त्यांच्या कामकाजाबद्दल ठोस समाधान व्यक्त झाले आहे. आकडेवारीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांना जनहित, प्रामाणिक प्रशासन, निर्णयक्षमता आणि युती सरकार चालविण्याच्या क्षमतेबाबत व्यापक पातळीवर पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसते.
मराठा-OBC समाजाला CM फडणवीसांबाबत काय वाटते?
ध्रुव रिसर्च आणि लोकमत यांनी मिळून केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात एकूण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मराठा, ओबीसी समाजाने समाधान व्यक्त केले आहे. मराठा समाज ६१ टक्के, गैर मराठा समाज ७९ टक्के, अन्य मागास वर्ग समाज ६९ टक्के, अनुसूचित जाती समाज ६५ टक्के, अनुसूचित जनजाती समाज ६५ टक्के, तर ४३ टक्के मुस्लिम समाज मुख्यमंत्र्यांबाबत एकूण समाधानी असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील सामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करणे, स्वतःच्या राजकीय स्वार्थापेक्षा राज्याच्या हिताला प्राधान्य देणे, सुधारणा घडवण्यास आवश्यक बदल घडवून आणण्याची क्षमता असणे, मुख्यमंत्री फडणवीस आपल्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे, स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, तसेच प्रशासकीय व राजकीय अडचणी व संकटे यशस्वीपणे हाताळणे आणि युती सरकार एकसंधपणे पुढे नेण्याची क्षमता या मुद्द्यांवरही सदर समाजातील लोकांनी सरासरी ६० टक्के सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील सामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याचा लौकिक असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट दिसून आले आहे.
दरम्यान, मागील वर्षांत राज्य सरकारने केलेल्या कामांची नागरिकांनी दिलेली कौल पाहिला, तर एक स्पष्ट प्रवाह दिसतो. पुरुषांना रस्ते, मेट्रो, पायाभूत सुविधा यांसारखे भविष्यवेधी विकास प्रकल्प अधिक प्रभावी वाटले, तर महिलांनी जलपुरवठा, कल्याणकारी योजना आणि महिला-केंद्रित उपक्रमांना थेट परिणाम करणारे बदल म्हणून मान्यता दिली आहे. उत्तम रस्ते जोडणी, पिण्याच्या पाण्याची सुधारित उपलब्धता, महिला-केंद्रित कल्याण योजना, आरोग्य सेवांचा विस्तार, ग्रामीण विकासातील पायाभूत सुविधांची सुधारणा यासंबंधीचे काम नागरिकांना प्रभावी वाटल्याचे दिसते. यातून हे स्पष्ट होते की, राज्यात विकास प्रकल्पांचा वेग आणि लोककल्याणाच्या गरजांवर झालेला थेट परिणाम जनतेच्या मनावर ठसा उमटवत आहेत.
कोणी कसे केले सर्वेक्षण?
ध्रुव रिसर्च ही सर्वेक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील नामवंत संस्था असून, निःपक्षपाती सर्वेक्षण करण्याचा संस्थेचा लौकिक आहे. ध्रुव रिसर्च आणि लोकमतने हे सर्वेक्षण केले आहे. २१ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ९५ विधानसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आले. विविध स्तरातील ९,८०० जणांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यात ३५ टक्के महिला होत्या.
Web Summary : Survey reveals 65% satisfaction with Maharashtra's Mahayuti government under Fadnavis. Maratha, OBC communities largely content. Focus on public welfare, development evident.
Web Summary : सर्वेक्षण से पता चला कि फडणवीस के नेतृत्व वाली महाराष्ट्र की महायुति सरकार से 65% संतुष्ट हैं। मराठा, ओबीसी समुदाय काफी हद तक संतुष्ट हैं। जन कल्याण, विकास पर ध्यान केंद्रित।