सांगली - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) देशात बदल घडवण्यासाठी १० वर्ष खूप आहेत. तुम्ही देशातील जनतेला फसवलं. मोदी गॅरंटी ही खोटी आहे. ही भ्रमिष्ट लोकांची टोळी आहे. वेळ घालवायचा असेल तर लोकांनी सिनेमाला जावं नाहीतर मोदींच्या भाषणला जावं. 'हेलिकॉप्टरसे बाय रोड मै पोहचा' असं भाषणात मोदी म्हणाले, आता ते हवेत रोड बांधायला लागलेत. हे भ्रमिष्ट लोक देशावर राज्य करतायेत अशा शब्दात संजय राऊतांनीभाजपावर घणाघात केला.
सांगली इथं चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत संजय राऊत म्हणाले की, जो आपल्या पक्षासोबत, विचारांशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो या भागातील जनतेशी एकनिष्ठ कसा राहील? कुणी काही केले तरी या देशात, महाराष्ट्रात बदल घडवण्याची ताकद शिवसेनेत आहे. अबकी बार ४०० पार मोदी म्हणतायेत परंतु तुम्ही २०० पार होत नाही याची खात्री आहे. सांगलीत अबकी बार चंद्रहार, गुजरातमध्येही मोदी हरतील असा रिपोर्ट आहे. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात घराघरात औषध पोहचेल, अन्नधान्य पोहचेल का याची काळजी घेतली. तेव्हा नरेंद्र मोदी थाळ्या वाजवा, घंटा वाजवा, टाळ्या वाजवा हे सुरू होते. १४० कोटींचा देश, परदेशात गेल्यावर लोक हसतात. या देशाला ७० वर्षात विकास झाला पण हे सरकार पुन्हा २०० वर्ष मागे घेऊन चाललेत. त्यामुळे देशाला, महाराष्ट्राला प्रतिष्ठा द्यायची असेल तर कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका असं राऊतांनी म्हटलं.
तसेच या मतदारसंघात घरोघरी पोहचून प्रचार केला पाहिजे. लोक मोदींना कंटाळलेत. ८० कोटी जनतेला फुकट धान्य देणे ही सरकारची कर्तबगारी, याचा अर्थ बेरोजगारी वाढली आहे. कुणाच्या हाताला काम नाही. म्हणजे तुम्ही लोकांना गुलाम बनवतायेत. ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालो परंतु गेल्या १० वर्षात मोदींनी लोकांना गुलाम बनवून टाकलं. आपण सगळे मोदी, अंबानी, अदानीचे गुलाम आहोत. मोदी सत्तेत आले तेव्हा गॅस सिलेंडर ४०० रुपयाला होता आज १४०० रुपयांवर गेला अशी टीकाही राऊतांनी केली.
काहीजण अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करतायेत
वसंतदादांचे राजकारण सामान्य माणसाला पोषक होतं. शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण वसंतदादांनी केले. त्या शेतकऱ्याचा मुलगा पुढे येतोय. आज कुणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसेनेत आहे. शिवसेना वाघाची औलाद आहे. काही जणांना अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची आहे. काहीही करून भाजपाचा खासदार निवडून आणायचा आहे. पण जोपर्यंत चंद्रहार रिंगणात आहे. तोपर्यंत भाजपाचा खासदार टिकणार नाही अशी भीती आहे असा आरोप संजय राऊतांनी नाव न घेता काँग्रेस नेत्यांवर केला.