Lockdown in Maharashtra: Strict lockdown in the state from tonight? Uddhav Thackeray will declaire | Lockdown: राज्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन? जिल्हाबंदी; उद्धव ठाकरे घोषणा करणार

Lockdown: राज्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन? जिल्हाबंदी; उद्धव ठाकरे घोषणा करणार

- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात बुधवारी रात्रीपासून १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी याबाबत एकमताने सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय जाहीर करतील. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी विनापरवाना प्रवास करता येणार नाही, असे आदेश काढावेत, असेही अनेक मंत्र्यांनी बैठकीत सांगितले.


मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह दोन प्रधान सचिवांची एक समिती तयार करण्यात आली असून, त्या समितीने याबाबत उद्या सकाळपर्यंत नियम तयार करावेत आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत ते जाहीर करावेत, असे मत सगळ्या मंत्र्यानी मांडले. सरकारने साडेपाच हजार कोटींचे पॅकेज गोरगरिबांसाठी देऊ केले आहे. आज परिस्थिती कोणाचा रोजगार बुडतो, याकडे लक्ष देण्याची आहे, की लोकांचा जीव वाचवला पाहिजे याकडे लक्ष देण्याची आहे? याचा निर्णय घ्यावाच लागेल. सर्वोच्च प्राधान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी द्यावे लागेल. त्याला दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 


सकाळी सात ते सकाळी अकरा या वेळेत खाद्य पदार्थांची भाजीपाल्याची दुकाने चालू राहतील. तसा आदेश काढण्यात आला आहे. त्याशिवाय अन्य वेळेत काहीही चालू राहणार नाही. सरकारी आस्थापनांमधील उपस्थितीदेखील ५० टक्क्यांपेक्षा कमी करता येईल का, याचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. मुंबईची लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी वापरली जाईल, असे आदेश काढा, अशी मागणी बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी केल्याचे समजते. लॉकडाऊनबद्दल निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊ केल्याचे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सांगितले. 


ज्या खासगी आस्थापनांना बंदमधून सूट देण्यात आली आहे, त्या चालू राहतील, माध्यमांना यातून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे वर्तमानपत्रांची कार्यालये सुरू राहतील, अशीही चर्चा बैठकीत झाल्याचे एका मंत्र्याने सांगितले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने हाताळावे, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली.

ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारावेत
- प्रत्येक प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात आरोग्य विभागाच्या मदतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी ऑक्सिजन प्लांट तातडीने उभे करावेत. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मंडळामधून देण्यात यावा. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागीय आयुक्तांची असेल.
- हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारी २०० छोटी यंत्रे प्रत्येक जिल्ह्यासाठी तातडीने खरेदी करावीत, ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या सर्व ठिकाणी ग्रीन कॉरिडोर उभे करावेत, पोलिसांनी ऑक्सिजनच्या वाहतुकीस सर्वोच्च प्राधान्य द्यावे, कोणत्याही टोल नाक्यावर ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्या जाऊ नयेत.

पालक सचिव करतात काय?
- आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महसूल, नगरविकास असे काही सचिव वगळता अन्य सचिवांकडे सध्या नेमके कोणते काम आहे, असे प्रश्नही काही मंत्र्यांनी उपस्थित केले. पालक सचिवांनी गंभीरपणे आपापल्या जिल्ह्याकडे पाहिले पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

बाजाराची नवी वेळ सकाळी ७ ते ११ 
सर्व किराणा, भाजीपाला, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री फिशसह), कृषी उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची दुकाने, पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होम डिलिव्हरी करता येईल. 
n आतापर्यंत ही दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. पेट्रोल पंपावर खासगी वाहनाकरिता पेट्रोल/ डिझेल/ सीएनजी /एलपीजी गॅस विक्री  सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत सुरू राहील.
n काढलेला नवा आदेश मंगळवारी रात्री 
८ पासून लागू झाला असून, तो १ मे रोजी सकाळी ७ पर्यंत कायम असेल.  
n अत्यावश्यक सेवांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे.  स्थानिक प्रशासन तेथील परिस्थिती पाहून या वेळेत बदल करू शकेल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

राज्यातील सर्व खासगी आस्थापना शंभर 
टक्के बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, अशी तक्रार अनेक मंत्र्यांनी बैठकीत केली. त्यावर स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खासगी आस्थापना बंद आहेत की नाही, याची चौकशी करावी. ज्या आस्थापना चालू असतील, त्यांना सक्तीने बंद करायला लावावे. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री    

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown in Maharashtra: Strict lockdown in the state from tonight? Uddhav Thackeray will declaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.