पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 10:32 IST2025-11-17T10:31:21+5:302025-11-17T10:32:11+5:30
Chakan Municipal Council Election 2025: बऱ्याच वर्षांनंतर होत असलेल्या राज्यातील विविध नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे काही ठिकाणी एकत्र आल्याचं अजब चित्रही दिसत आहे.

पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
बऱ्याच वर्षांनंतर होत असलेल्या राज्यातील विविध नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे काही ठिकाणी एकत्र आल्याचं अजब चित्रही दिसत आहे. पुण्यातील चाकण नगर परिषदेतही शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनिषा गोरे यांना ठाकरे गटाने पाठिंबा जाहीर केला आहे.
मनिषा गोरे ह्या शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी आहेत. सुरेश गोरे यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेने २०१६ मध्ये झालेली चाकण नगर परिषदेची निवडणूक जिंकली होती. दरम्यान, यावेळच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने मनिषा गोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाने मनिषा गोरे यांना नगराध्यक्षरपदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. दिवंगत सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून हा पाठिंबा दिल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. मनिषा गोरे यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिवसेना शिंदे गटाचे समर्थक आमदार शरद सोनावणे हे उपस्थित होते.
दरम्यान, चाकणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याबाबत स्पष्टीकरण देताना आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की, चाकणमध्ये ठाकरे गटाने दिलेला पाठिंबा ही युती म्हणता येणार नाही. २०१४ साली सुरेशभाऊ गोरे हे शिवसेनेच्या माध्यमातून आमदार झाले. मी २०२४ मध्ये जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा गोरे कुटुंब हे माझ्या प्रचाराच्या व्यासपीठावर उपस्थित होतं. त्यांनी माझा प्रचार केला. आता सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे ह्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत सुरेशभाऊंना आदरांजली म्हणून आम्ही मनिषा गोरे यांना पाठिंबा देत आहोत, अशी माहिती बाबाजी काळे यानी दिली.
तसेच हा पाठिंबा केवळ चाकणच्या नगराध्यक्षपदापुरताच मर्यादित आहे. चाकण तालुक्यामधील राजगुरूनगर आणि आळंदी नगर परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढत आहोत, अशी माहितीही काळे यांनी दिली.