थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 06:21 IST2025-12-25T06:20:54+5:302025-12-25T06:21:13+5:30
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला जाईल.

थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेली व्यक्ती नगरसेवक म्हणूनही विजयी झालेली असेल तर तिची दोन्ही पदे कायम राहतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून मत देण्याचा अधिकार असेल. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला जाईल.
राम शिंदेंनी जिंकलेल्या जामखेडमध्ये लाभ
एखादी व्यक्ती थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली असेल व त्याचवेळी एखाद्या वॉर्डातून ती नगरसेवक म्हणूनही विजयी झाली असेल आणि नगराध्यक्ष म्हणून तिच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तरी ती नगरसेवक म्हणून कायम राहील.
जामखेड नगरपरिषदेत भाजपच्या प्रांजल चिंतामणी या नगराध्यक्षपदी तसेच नगरसेवक म्हणूनही विजयी झाल्या आहेत. या निर्णयामुळे त्या दोन्ही पदांवर कायम राहतील. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी ही नगरपरिषद जिंकत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आ. रोहित पवार यांना धक्का दिला. आजच्या निर्णयात ‘जामखेड‘ची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.