मुंबई - राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले. मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ईव्हीएममध्ये उमेदवारांचे भवितव्य कैद झाले आहे. ज्याठिकाणी मतदान झाले त्याठिकाणी स्टाँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आले आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गोंदियाच्या सालेकसा येथे ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपावरून राडा झाला आहे तर सांगलीत मतदानात अचानक कशी वाढ झाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान २ डिसेंबरला झाले. त्यानंतर आता याठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाडी आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना यांच्यासह शरद पवारांच्या पक्षातील उमेदवारांनी तहसिल कार्यालयाला घेराव घातला. जवळपास १२ तास कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर रात्री उशिरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे.
याबाबत काँग्रेस नेते प्रफुल अग्रवाल म्हणाले की, शासन आणि प्रशासन या दोघांनी संगनमताने ईव्हीएमची सील तोडली. आमचा एकही प्रतिनिधी बोलवला नाही. ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आली. मात्र निवडणूक आयोगाला चुकीचा अहवाल पाठवून आमच्या पक्षातील लोक तिथे उपस्थित होते असं सांगण्यात आले. निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात आली असा आरोप त्यांनी केला. परस्पर निवडणूक अधिकाऱ्यांनी सील केलेल्या पेट्या उघडल्या आणि पुन्हा सील करून स्टाँगरूममध्ये जमा केल्या. पंचांसमक्ष सील झालेल्या पेट्या उघडण्याचा अधिकार कुणी दिला? ज्या अधिकाऱ्यांनी हे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे बबलू कटरे यांनी केली.
दुसरीकडे सांगलीतील आष्टा नगरपरिषदेत मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप करत शरद पवार गटासह शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला. याठिकाणी स्टाँगरूमबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप केला. वेबपोर्टलवरून मतदानाच्या टक्केवारीबाबत आकडेवारी मिळाली. एकूण मतदार संख्या ३३ हजार ३२८ दाखवली, एका प्रभागात १३११ मतदान असताना तिथे ४ हजार मतदान दाखवले आहे. ६ नंबर प्रभागात एकूण मतदान ३ हजार ५६ आहे. यात मतदान २३९४ झाले आहे तिथे १७९५ मतदान दाखवले आहे. यासारख्या अनेक त्रुटी दिसून येत आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे असा दावा उमेदवारांनी केला आहे.
दरम्यान, स्टाँगरूमबाहेर राज्य निवडणूक आयोग, पोलीस काळजी घेत असते. काही लोक पराभूत मानसिकतेत असतात. त्यांना निकालाची धाकधूक असते. त्यातून नैराश्य येते आणि हे आरोप केले जातात. निवडणुकीत निकालापूर्वीच ज्यांना पराभव दिसत असतो ते या भूमिका घेत असतात असं सांगत भाजपा नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले आहे.
Web Summary : Controversy erupted after local elections. Gondia faces EVM tampering allegations, triggering protests. Sangli sees accusations of inflated voter turnout, prompting unrest outside strongrooms.
Web Summary : स्थानीय चुनावों के बाद विवाद। गोंदिया में ईवीएम से छेड़छाड़ के आरोपों से विरोध प्रदर्शन शुरू हो गया। सांगली में बढ़े हुए मतदाता मतदान के आरोपों से स्ट्रांगरूम के बाहर अशांति।