बेळगावजवळ आढळला जिवंत बॉम्ब
By Admin | Updated: March 16, 2015 00:14 IST2015-03-15T22:34:27+5:302015-03-16T00:14:14+5:30
उच्चस्तरीय तपास सुरू : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या निर्मूलन पथकाने केला निकामी

बेळगावजवळ आढळला जिवंत बॉम्ब
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सोनोली येथील माजी सरपंच अशोक पाटील यांच्या शेतात रविवारी सकाळी जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ माजली. तो लष्करात वापरण्यात येणारा ‘मोर्टार’ बॉम्ब होता. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बॉम्ब निर्मूलन पथकाने रविवारी दुपारी हा बॉम्ब निकामी केला. बॉम्ब निकामी केल्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा बॉम्ब येथे कसा आला, याचा उच्चस्तरीय तपास सुरू आहे. बेळगावपासून १७ किलोमीटर अंतरावरील सोनोली गावी अशोक शटूप्पा पाटील यांचे बीजगरणी रोडवर शेत आहे. शनिवारी ते शेतात गेले असता त्यांना जमिनीत अर्ध्यावर रुतलेल्या स्थितीतील बॉम्ब दिसला. त्यांनी घाबरून त्याबाबत कोणालाही सांगितले नाही. रविवारी सकाळी मात्र त्यांनी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यास ही माहिती दिली. त्यानंतर प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन पोलीस घटनास्थळी आले. बंगलोर येथील बॉम्ब निर्मूलन पथकालाही पाचारण केले. जांबोटीजवळील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बॉम्ब निर्मूलन पथकाने रविवारी दुपारी हा बॉम्ब स्फोट घडवून निकामी केला. त्याचा आवाज दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकायला गेला. हा बॉम्ब येथे कसा आला, याचा उच्चस्तरीय तपास सुरू आहे. ‘बेळगाव मराठा इन्फंट्री’च्या सूत्रांनुसार, ‘मोर्टार’ या प्रकारचा जिवंत बॉम्ब बेळगावात नाही. (प्रतिनिधी)
बेळगाव तालुक्यातील सोनोली येथे रविवारी शेतात सापडलेला बॉम्ब निकामी करण्यासाठी आलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान.