युवकांचेच साहित्य प्रभावी
By Admin | Updated: March 18, 2015 00:44 IST2015-03-18T00:44:11+5:302015-03-18T00:44:11+5:30
आमच्या पिढीचे साहित्य समीक्षकांच्या मतानुसार साहित्य नसेलही; पण ते महत्त्वाचं आहे. ते पुस्तकापेक्षाही जास्त वाचले जाते. ते जगण्याच्या अधिक जवळ जाणारे असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे.

युवकांचेच साहित्य प्रभावी
सचिन परब : ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात
पुणे : आमच्या पिढीचे साहित्य समीक्षकांच्या मतानुसार साहित्य नसेलही; पण ते महत्त्वाचं आहे. ते पुस्तकापेक्षाही जास्त वाचले जाते. ते जगण्याच्या अधिक जवळ जाणारे असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. बहुतांश प्राध्यापक, लेखकरावांपेक्षा युवकांचे साहित्य किती तरी चांगले असल्याचे परखड मत पहिल्या अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सचिन परब यांनी मंगळवारी व्यक्त केले.
एस. एम. जोशी सभागृहात पहिल्या अखिल भारतीय मराठी
युवा संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी
परब बोलत होते. संमेलनाच्या
कॉम्रेड गोविंद पानसरे व्यासपीठावर या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. हरी नरके आणि टेकरेलचे चेअरमन भूषण कदम उपस्थित होते.
सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यालय ते संमेलनस्थळ असा मार्ग असणाऱ्या या दिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागताध्यक्ष टेकरेल अकॅडमीचे संचालक महेश थोरवे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय झोंबाडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
मराठी बोलण्याची लाज वाटू देऊ नका
मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा मिळविण्याचे प्रयत्न होत असताना तरुणांनी मराठी बोलण्याची लाज वाटू देऊ नका, असे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके यांनी सांगितले. इतर भाषांचा आदर जरूर करा; मात्र आपल्या मातृभाषेची लाज वाटू देऊ नका, असे सांगून भविष्यात मराठीतच बोलण्याचा व स्वाक्षरी करण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला.
सध्याच्या युवा पिढीपुढे भाकरी आणि सेक्स हे दोन मोठे प्रश्न तयार झाले आहेत. अत्यंत ज्वलंत व जिव्हाळाचे हे प्रश्न तरुणाईला भेडसावत आहेत. मात्र, यांपैकी सेक्सची दखल घेऊन योग्य भूमिका मांडणारे साहित्यलेखन होत नाही.
- प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस,
ज्येष्ठ विचारवंत
तरुणांमध्ये संस्कारित विचारांचा अभाव : लक्ष्मीकांत देशमुख
माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध असूनही त्यामध्ये ज्ञानाची कमतरता जाणवत आहे. स्वत: एखाद्या घटनेवर किंवा परिस्थितीवर विचार करणे, त्यावर चर्चा करणे, कुतूहलाने एखादी गोष्ट जाणून घेणे आता कमी झाले आहे, असे मत ज्येष्ठ सनदी अधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.
देशमुख म्हणाले, ‘‘आजचा तरुण पुरोगामी होण्याऐवजी प्रतिगामी बनत चालला आहे. १९७०-८०च्या दशकामध्ये पुरोगामी विचार असणे ही फॅशन नव्हती, तर समाजाप्रति असलेली तळमळ होती. त्यामुळे प्रतिगामी बनत असलेल्या तरुणांनी विचार बदलले पाहिजेत. गरिबांसाठी तसेच अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी लेखनाचा हत्यार म्हणून वापर करणे, ही काळाची गरज आहे.’’
मराठी युवा साहित्य संमेलनामधील सत्कार समारंभात ते बोलत होते. युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अवधूत डोंगरे व रवी कोरडे आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त प्रदीप माने यांचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा मित्र मंडळचे सचिव भाऊसाहेब जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे, विजय कोलते, संमेलनाध्यक्ष सचिन परब उपस्थित होते.
त्याच-त्याच साहित्यिकांना संमेलनात बोलावून जुनेच विषय उगाळत बसण्यापेक्षा तरुणांचे विचार ऐकून त्यांना साहित्य संमेलनात सामावून घेतले पाहिजे. यासाठी स्थानिक पातळीवर संमेलने भरवून विविध प्रकारचे साहित्य लिहिणाऱ्या तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे.
- दगडू लोमटे,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते