साहित्य संमेलन निवडणूक; मतपत्रिका पोस्टाने रवाना
By Admin | Updated: October 8, 2014 03:21 IST2014-10-08T03:21:15+5:302014-10-08T03:21:15+5:30
मतपत्रिका पाठविण्याची अंतिम तारीख ९ आॅक्टोबर असतानाही दोन दिवस आधी व्यवस्थित वर्गीकरण करून मतपत्रिका पाठविल्याचे महामंडळाचे निवडणूक अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले.

साहित्य संमेलन निवडणूक; मतपत्रिका पोस्टाने रवाना
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १,०७० मतदारांना मंगळवारी पोस्टाने फ्रँकलीन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. मतपत्रिका पाठविण्याची अंतिम तारीख ९ आॅक्टोबर असतानाही दोन दिवस आधी व्यवस्थित वर्गीकरण करून मतपत्रिका पाठविल्याचे महामंडळाचे निवडणूक अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या मतपत्रिका मतदारांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड दरवर्षी होत असल्याने मागील वर्षी रजिस्टर एडीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक मतपत्रिकेची नोंद निवडणूक अधिकाऱ्यांकडे होती. परंतु यंदा महामंडळाच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा पोस्टानेच मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा मतदारांपर्यंत त्या वेळेत पोहोचतील, याविषयी साहित्यविश्वात साशंकता आहे. पोस्टाने मतपत्रिका पाठविल्या असल्या तरी त्याचे प्रदेशानुसार व्यवस्थित वर्गीकरण करून देण्यात आले आहे. पुण्यातील मतदारांपर्यंत ५-६ दिवसांत तर अन्य ठिकाणी अगदी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांपर्यंतही २० आॅक्टोबरपर्यंत मतपत्रिका पोहोचतील, अशी आशा असल्याचे आडकर यांनी सांगितले. मागील वर्षी रजिस्टर एडीला ४,००० रुपये खर्च आला होता तर यंदा ११ हजार २०० रुपये खर्च आल्याचे आडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)