दारूला महागाईची झिंग, राज्यात देशी-विदेशी मद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ; विदेशी मद्याची सर्वाधिक ५५ ते ८५ रुपये भाववाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:40 IST2025-06-11T07:39:47+5:302025-06-11T07:40:00+5:30
Maharashtra Liquor Prices News: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारने मंगळवारी मद्याच्या दरात तब्बल ९ ते ७० टक्के अशी भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेतला. मद्याच्या दराबरोबरच मद्य विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवाना शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

दारूला महागाईची झिंग, राज्यात देशी-विदेशी मद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ; विदेशी मद्याची सर्वाधिक ५५ ते ८५ रुपये भाववाढ
मुंबई - आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारने मंगळवारी मद्याच्या दरात तब्बल ९ ते ७० टक्के अशी भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेतला. मद्याच्या दराबरोबरच मद्य विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवाना शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या दरात सर्वाधिक ५५ ते ८५ रुपये वाढ करण्यात आली आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत दरवर्षी १४ हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या गटाने मद्यनिर्मिती धोरण, लायसन्स, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी इतर राज्यातील धोरणात्मक बाबींचा अभ्यास करुन शासनास अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने मद्याच्या सुधारित विक्री दरात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
‘महाराष्ट्र मेड लिकर’, नवा ब्रँड
महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक असे उत्पादन करु शकतील. त्यांना या नव्या ब्रँडची नोंदणी करणे आवश्यक राहील.
दरवाढ कधीपासून? : या निर्णयांचे इतिवृत्त पुढील बैठकीत मंजूर होईल. त्यानंतर जीआर काढून दरवाढ लागू केली जाईल.
क्वार्टर (१८० मिली) आता कितीला पडेल?
मद्याचा प्रकार जुना दर नवीन दर
देशी मद्य ७० रुपये ८० रुपये
महाराष्ट्र मेड लिकर नवीन प्रकार १४८ रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य १२० ते १५० रुपये २०५ रुपये
विदेशी मद्याचे प्रिमियम ब्रँड ३३० रुपये ३६० रुपये
परवाना शुल्कात किती झाली वाढ?
विविध सीलबंद विदेशी मद्य विक्री परवाना (एफएल-२) व परवाना कक्ष हॉटेल/रेस्टॉरंट परवाना (एफएल-३) करार करून भाडेतत्त्वावर चालवता येईल. त्याकरिता वार्षिक लायसन्ससाठी अनुक्रमे १५ टक्के व १० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.
यापूर्वी दरवाढ कधी?
यापूर्वी २०२२ मध्ये देशी दारूच्या दरात वाढ झाली होती. मात्र, विदेशीच्या दरात २०११ पासून वाढ झाली नव्हती. त्यामुळे १४ वर्षानंतर ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली.