होऊ दे चर्चा...

By Admin | Updated: October 8, 2014 13:38 IST2014-10-08T03:57:02+5:302014-10-08T13:38:13+5:30

‘लक्ष्मी’ मंदिराजवळील अलिशान ‘लोटस्’ महालात नितीनबापू नागपूरकर महाराजांचा दरबार भरलेला. कैक नेते आपापला हात दाखवायला रांगेत उभारलेले. ‘भगव्या’ चोचीचा ‘हिरवा’ पोपट एकेक पत्ते ओपन करू लागलेला.

Let's talk ... | होऊ दे चर्चा...

होऊ दे चर्चा...

लक्ष्मीदर्शनाचा प्रसाद..
.. वहाण पीडा योग !

(स्थळ : ‘लक्ष्मी’ मंदिराजवळील अलिशान ‘लोटस्’ महालात नितीनबापू नागपूरकर महाराजांचा दरबार भरलेला. कैक नेते आपापला हात दाखवायला रांगेत उभारलेले. ‘भगव्या’ चोचीचा ‘हिरवा’ पोपट एकेक पत्ते ओपन करू लागलेला.)
उद्धो : (मनगटावरचं शिवबंधन मागं सरकवत) महाराजऽऽ माझ्या हातावरच्या रेषा काय म्हणतात? ‘राजयोग’ आहे की नाही?
महाराज : (गोबऱ्या-गोबऱ्या गालावरच्या नाजूक खळीत इवलीशी मिशी वक्र करत) अरेऽऽरेऽऽ.. तुमच्या कुंडलीत ‘मोदींचा गुरु’ वक्री झाल्यानं आगामी काळात केवळ ‘संघर्षाचा योग’ आहे.
उद्धो : (देवेंद्रपंत अन् एकनाथभाऊंकडं रागानं पाहात) मला ‘वक्री गुरु’चं भय नाही; मात्र खालच्या ‘राहू-केतू’च्या लुडबुडीचा राग येतोय. ही बघा माझी नवी कुंडली. कालच बारामतीच्या एका जाणकार ज्योतिषानं तयार करून पाठविलीय.
महाराज : (कुंडली पाहून दचकत) आँ? तुमचा ‘सत्तेचा शुक्र’ एकोणीस तारखेनंतर शरद ‘चंद्रा’शी युती करणार असल्याचं कुंडलीत दिसतंय. अशी कशी काय तुमची कुंडली बदलू शकते ?
पृथ्वीराज : (डोकं खाजवत) बारामतीचे ज्योतिषबुवा काहीही करू शकतात. ‘सत्तांतर’ अन् ‘पक्षांतर’ यात माहीर असल्यानं ते ‘कुंडल्यांतर’ही करू शकतात.
राज : (पानोपानी खाडाखोड केलेल्या ब्लू प्रिंट’ची रद्दी समोर आदळत) महाराजऽऽ ती कुंडली बुडवा उजनी धरणाच्या पाण्यात. अगोदर या रद्दीचं काय करू ते सांगा.
महाराज : (डोळे मिचकावत) चिंता नसावी भक्ता. आमचा स्पर्श लाभला तर तुझ्या रद्दीचंही सोनं होईल. फक्त पुढचे सात-आठ दिवस मौन व्रत बाळग... कारण तुझ्या जीभेतली विध्वंसक शक्ती तुलाच मारक ठरू शकतेय.
राज : (चरफडत) मग तोपर्यंत काय करू महाराज?
महाराज : मराठी व्याकरणाची पुस्तकं वाच. शक्य झालं तर गुजराथी भाषेचाही अभ्यास कर. भविष्यात आमच्याशी ‘सुंसवाद’ साधायला उपयोगी ठरेल.
रामदास : (दाढीवरून हात फिरवत नेहमीची ‘ट’ ला ‘ट’वाली कविता म्हणत) तुम्ही ‘लक्ष्मी’पुत्र’तर आम्ही ‘सरस्वती’ची लेकरं..‘राखी’ सोबत असताना, विरोधकांना आणू फेफरं !
सदाभाऊ : (‘लक्ष्मी’चं नाव कानावर पडताच लगेच कान टवकारून उत्साहानं) महाराजऽऽ तुम्ही म्हणे ‘लक्ष्मीदर्शन’ देता. मग मला कधी दिसणार?
महाराज : (मानभावीपणे हात जोडत) मी तर साधा लक्ष्मीभक्त. मी कोण ‘लक्ष्मीदर्शन’ घडविणारा? मी फक्त ‘लक्ष्मी’च्या आगमनाची जाणीव करून देणारा.
उद्धो : (हेटाळणीच्या सुरात) पण गेल्या दोन महिन्यांपासून तुमच्या महालात ‘प्रवेश’ करणारे महाभाग तर ‘लक्ष्मीपुत्र’च आहेत की !
महाराज : (तोंडावर बोट ठेवून) भक्तहोऽऽ आता माझ्या मौनव्रताच्या काळाला प्रारंभ होतोय; कारण आजकाल माझा शब्द माझ्यावरच उलटतोय. बहुधा माझेच ग्रह उलटे फिरलेत वाटतं.
उद्धो : (खोचकपणे) होय. म्हणूनच की काय , तुमच्या कुंडलीत परवा रात्री पुण्याचा ‘वहाण योग’ होता वाटतं!
महाराज : (लगेच सावरून घेत) छे. छे. ‘आपलं वहाण देशभरात गाजलं पाहिजे,’ असं आमच्या ‘सुरत’च्या बड्या महाराजांनी नुकतंच कोल्हापुरात सांगितलं होतं. त्याचाच हा प्रत्यय !
- सचिन जवळकोटे

Web Title: Let's talk ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.