‘त्या’ महाविद्यालयांविरुद्ध गुन्हे दाखल करू; विनोद तावडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:00 IST2018-07-25T02:00:26+5:302018-07-25T02:00:46+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Let us register criminal cases against those colleges; Warning of Vinod Tawde | ‘त्या’ महाविद्यालयांविरुद्ध गुन्हे दाखल करू; विनोद तावडे यांचा इशारा

‘त्या’ महाविद्यालयांविरुद्ध गुन्हे दाखल करू; विनोद तावडे यांचा इशारा

पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिक्षण शुल्काच्या केवळ ५० टक्के इतकी रक्कम विद्यार्थ्यांकडून घ्यावी, अन्य ५० टक्के रक्कम सरकार देणार आहे. परंतु काही महाविद्यालयांमध्ये १०० टक्के शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा महाविद्यालयांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे.
राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटले आहे. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. या योजनेची महाविद्यालयांनी योग्य प्रकारे अंमलबजावणी न केल्यास त्यांच्याविरुद्ध शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजानं जसे शांतपणे मोर्चे काढले तसे जगात कोणीही काढले नाहीत. गेल्या अनेक वर्षांत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजासाठी केवळ घोषणा केल्या. तत्कालीन सरकारमधील नेत्यांनी केवळ आपल्या घराणेशाहीला फायदा होईल, याकडे लक्ष दिले. परंतु महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. परंतु न्यायालयामध्ये या आरक्षणाला स्थगिती आहे. सरकारने मराठा समाजासाठी शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह योजना घोषित केल्या. मराठा समाजाची भावना ही प्रामाणिक आहे. परंतु काहीजण याचा फायदा घेऊन, वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका तावडे यांनी केली आहे.
मराठा समाजाने घोषित केलेल्या उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत, तेथील स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून निर्णय घेईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेणे बेकायदेशीर असून, महाविद्यालयांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क आकारु नये, असे आदेश सर्व महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. तरीही विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क घेतले असल्यास अथवा कोणत्याही विद्यार्थ्याची फसवणूक झाली असल्यास, त्या विद्यार्थ्यांनी विभागीय नोडल अधिकाºयांकडे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन तावडे यांनी केले आहे.

Web Title: Let us register criminal cases against those colleges; Warning of Vinod Tawde