"जायचे त्यांनी खुशाल जा, निष्ठावंतांसोबत पक्ष वाढवू", विनायक राऊतांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 08:22 IST2025-01-24T08:18:29+5:302025-01-24T08:22:01+5:30

आज काही पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

"Let them go happily, let's grow the party with loyalists", Vinayak Raut criticizes those who left the party | "जायचे त्यांनी खुशाल जा, निष्ठावंतांसोबत पक्ष वाढवू", विनायक राऊतांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

"जायचे त्यांनी खुशाल जा, निष्ठावंतांसोबत पक्ष वाढवू", विनायक राऊतांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

रत्नागिरी : ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल ते खुशाल जाऊ देत. जे शिल्लक राहतील, त्यांना घेऊन पक्ष वाढवण्याची शिकवण आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यानुसार आम्ही पक्ष वाढवू, असे मत उद्धवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील काल (दि.२३) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

उद्धवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याखेरीज आज (दि.२४) काही पदाधिकारीही उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. यावर बोलताना विनायक राऊत यांनी आपली भूमिका मांडली. बंड्या साळवी यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, तर आपल्याला अजिबात दुःख होणार नाही. जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. जे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात राहतील, त्यांना घेऊन पक्ष वाढवला जाईल, असे ते म्हणाले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धवसेना स्वबळावर लढणार की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेससमवेत महाविकास आघाडी करून लढणार, याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी चर्चा केली आहे. त्या सर्वांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह केला आहे, असे विनायक राऊत म्हणाले. तसेच, त्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे लवकरच घेतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर अनेक विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर आता कोकणात शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटात गळती सुरु झाली आहे. शिंदे सेनेकडून ठाकरे सेनेला धक्का देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून आता रत्नागिरीच्या ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वासह तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय, आज काही पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: "Let them go happily, let's grow the party with loyalists", Vinayak Raut criticizes those who left the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.