Leopard Rescue: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:12 IST2025-12-19T15:10:53+5:302025-12-19T15:12:58+5:30
Mira Bhayandar Talav Road Leopard News: भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातील पारिजात निवासी इमारतीमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

Leopard Rescue: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातील पारिजात निवासी इमारतीमध्ये शिरलेल्या बिबट्याने आज सकाळपासून स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण केली. तब्बल सात तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वन विभाग आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तलाव रोड परिसरातील पारिजात इमारतीजवळ बिबट्या वावरत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. बिबट्याला पाहताच नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. याची माहिती मिळताच, मीरा-भाईंदर महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली.
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आज सकाळपासून 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू केले. बिबट्या एका निवासी इमारतीमध्ये शिरल्याने त्याला पकडण्याचे आव्हान मोठे होते. नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करत वन विभागाने बिबट्याला बेशुद्ध करण्याची योजना आखली. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.
या बिबट्याने परिसरातील सात जणांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. बिबट्याला पकडण्यात आल्याने तलाव रोड परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बिबट्याला मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क येथे नेण्यात येणार आहे. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली होती.