विधान परिषद निवडणूक : महायुतीतच रंगतेय ‘दोस्तीत कुस्ती’; अजित पवार गटाच्या लोकप्रतिनिधींची बैठकीस दांडी
By संकेत शुक्ला | Updated: June 17, 2024 21:25 IST2024-06-17T21:24:55+5:302024-06-17T21:25:28+5:30
शिक्षक विधानपरिषदेसाठी महायुती आणि महाआघाडी यांच्याकडून उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

विधान परिषद निवडणूक : महायुतीतच रंगतेय ‘दोस्तीत कुस्ती’; अजित पवार गटाच्या लोकप्रतिनिधींची बैठकीस दांडी
नाशिक : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश पचविताना मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असताना विधानपरिषद निवडणुकीत नाशिक विभागात राष्ट्रवादीतर्फे रिंगणात असलेल्या धुळे येथील ॲड. महेंद्र भावसार यांच्या उमेदवारीवर पदाधिकाऱ्यांनी प्रथमच शिक्कामोर्तब केल्याने युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही लढत मैत्रीपुर्ण आहे की दोस्तीत कुस्ती याबाबत गौडबंगाल कायम आहे.
शिक्षक विधानपरिषदेसाठी महायुती आणि महाआघाडी यांच्याकडून उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातही शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यातच लढत असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षानेही धुळे येथील भावसार यांना एबी फॉर्म दिला आणि तेव्हापासून महायुतीतील उमेदवाराने बंड केल्याचे बोलले जात होते. मात्र पक्षातील एकाही स्थानिक नेत्याने प्रचारासाठी पुढाकार घेत उमेदवाराबाबत अधिकृत माहिती दिली नव्हती. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनीही त्याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे वक्तव्य केले होते.
अशातच नाशिकमध्ये महायुतीतील दोन उमेदवार रिंगणात कसे याबाबत वरिष्ठ पातळीवरही कोणतीच चर्चा होताना दिसत नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण होते. हा गोंधळ दूर करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नाशिकमध्ये येत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भावसार हे आपले अधिकृत प्रतिनिधी असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता महायुतीत सर्व काही आलबेल नसून विधानपरिषदेत राष्ट्रवादीने नाशिक विभाग मतदारसंघात बंडखोरी करून युतीच्या विरोधात उमेदवार दिल्याचे स्पष्ट झाले. यावेळी बैठकीस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, श्रेयांश भावसार, अमर पाटील, गौरव गोवर्धने, योगेश निसळ, चेतन कासव, ऋषिकेश पिंगळे, रोहित पाटील आदी उपस्थित होते.
आमदार, ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती
नाशिकमध्ये अजित पवार गटाची ताकद मोठी आहे. जिल्हाध्यक्ष, आमदार यांसह विविध तालुक्यांमध्ये मोठ्या पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांची या बैठकीत अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यातील एकही आमदार या बैठकीस उपस्थित नव्हता. त्यामुळे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी असली तरी पदाधिकारी का आले नाही अशी चर्चा रंगली होती.