नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी स्थापनेसाठी सरसावले नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 09:07 AM2021-05-30T09:07:40+5:302021-05-30T09:08:28+5:30

गडकरी, फडणवीस, विजय दर्डा यांचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र

leaders come ahead for setting up a petrochemical refinery in Nagpur | नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी स्थापनेसाठी सरसावले नेते

नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी स्थापनेसाठी सरसावले नेते

googlenewsNext

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची रिफायनिंग क्षमता पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचा मानस व्यक्त केला आहे. पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठायचा असेल, तर देशाच्या सर्वच भागासह विदर्भाचादेखील सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी उद्योग क्षेत्राप्रमाणेच राजकीय नेत्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे. या नेत्यांमध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. विकास महात्मे, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार आशिष देशमुख यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

‘वेद’ (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) संस्थेतर्फे विदर्भात पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना नेत्यांनीदेखील पाठबळ दिले आहे. धर्मेंद्र प्रधान यांना पाठविलेल्या पत्रांमध्ये नेत्यांनी विदर्भावरील अन्याय, विदर्भातील क्षमता आदी मुद्दे सविस्तर मांडले आहेत.

वाहतूक खर्चात बचत
मध्य भारतात वर्षभरात १५ दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोलियम पदार्थांची आवश्यकता असून, हा पुरवठा पश्चिम किनारपट्टीहून होतो. प्रकल्प नागपुरात आला, तर वाहतुकीचा १० हजार कोटींचा अवाढव्य खर्चदेखील वाचेल.
- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री

उद्योग स्थापनेला पाठबळ मिळेल
नागपुरात प्रकल्प झाला, तर विदर्भात उद्योग स्थापनेला पाठबळ मिळेल. शिवाय नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्याने येथून देशाच्या कुठल्याही भागात सहजतेने पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करता येईल.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मध्य भारतातील उद्योगक्षेत्राचा विकास
मध्य भारतात सुमारे १५ सिमेंट कंपन्या आहेत व नागपूर-रायपूर येथे दोन मोठे विमानतळ आहेत. नागपुरात पेट्रोलियम रिफायनरी झाली, तर या सिमेंट कंपन्यांसोबतच मध्य भारतातील विविध उद्योगांना कच्चा माल पुरवता येऊ शकेल.
- विजय दर्डा,
माजी खासदार व चेअरमन,
लोकमत एडिटोरियल बोर्ड

एमएसएमईला चालना मिळेल
पेट्रोलियम रिफायनरीमुळे जोड उद्योगांची आवश्यकता भासेल व एमएसएमईमधील नवीन उद्योगांनादेखील चालना मिळेल.
- डॉ. विकास महात्मे, खासदार

उद्योगक्षेत्राला
बूस्टर डोस मिळेल
नागपूरजवळ पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्प स्थापन झाला, तर येथील उद्योगक्षेत्रांना कमी दरात पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होतील व उद्योगक्षेत्राला बूस्टर डोस मिळेल.
- अजय संचेती, माजी खासदार

लाखो रोजगार
निर्माण होतील
हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल, तसेच तीन लाख कोटींच्या या प्रकल्पातून लाखो तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.
- आशिष देशमुख, माजी आमदार

रिफायनरीमुळे विदर्भाचा फायदा
मध्य भारतातील उद्योगक्षेत्रांना कमी दरात पेट्रोलियम पदार्थ मिळतील.
हिंगणा, बुटीबोरी व मिहान या औद्योगिक भागासह मध्य भारतातील उद्योगक्षेत्राचा विकास होईल.
विदर्भात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाच लाख रोजगारांची निर्मिती होईल.
नागपुरातील प्रकल्पातून विदर्भाचे औद्योगिक मागासलेपण दूर होईल.
विदर्भातून देशाच्या सर्व भागातील निर्यात वाढेल

Web Title: leaders come ahead for setting up a petrochemical refinery in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.