गरिबांचा नेता, श्रमिकांचा ‘अण्णा’
By Admin | Updated: February 21, 2015 01:12 IST2015-02-21T01:12:02+5:302015-02-21T01:12:20+5:30
गोविंद पानसरे हे तसे ‘अण्णा’ या नावाने महाराष्ट्राला परिचित. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील असे एकही आंदोलन नसेल की, त्याच्याशी काही ना काही त्यांचा संबंध आला नाही.

गरिबांचा नेता, श्रमिकांचा ‘अण्णा’
नरेंद्र दाभोलकर यांचा खून हा त्यांच्या विचारासाठी झालेला खून आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात, व्यक्तिगत कामांसाठी त्यांना कोण शत्रू असणे संभवत नाही. त्यांनी जी विज्ञाननिष्ठा प्रतिपादली आणि ज्या विज्ञाननिष्ठेसाठी कार्य केले, त्यामुळे महाराष्ट्रभर अनेक शत्रू तयार झाले. त्यांच्या विवेकवादास विवेकाने उत्तर देऊन त्यांचा विचार आणि व्यवहार पराभूत करता येत नाही, असे ज्या फॅसिस्ट प्रवृत्तीच्या लोकांना वाटत होते, त्या प्रवृत्तीमधूनच हा खून झाला आहे. महात्मा गांधींचा खूनही अशाच कारणासाठी झाला होता. त्यांचा खून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सर्वधर्म समभावाचा विचार विचारांच्या साहाय्याने पराभूत करता येत नाही, असे ज्या शक्तींना वाटत होते, त्यांनी त्याच कारणासाठी त्यांचा खून केला, असे वारंवार सांगणारे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्यावरही त्याच कारणासाठी हल्ला व्हावा, हा किती दैवदुर्विलास. पानसरे अण्णा यांच्या हल्ल्यावरील दुसरे कोणतेच कारण असू शकत नाही. व्यक्तिगत जीवनात त्यांचा एकही शत्रू नाही. कारण तसा त्यांचा व्यवहारच नव्हता. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला हा पानसरे पेरत असलेले विचार ज्यांना अडचणीचे वाटत होते त्यांच्याकडूनच झाला हे स्पष्टच आहे.
गोविंद पानसरे हे तसे ‘अण्णा’ या नावाने महाराष्ट्राला परिचित. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील असे एकही आंदोलन नसेल की, त्याच्याशी काही ना काही त्यांचा संबंध आला नाही. कृतिशील विचारवंत, गोरगरीब, श्रमिक, कामगार यांच्या हितासाठी जीव पणाला लावून झगडणारे नेते, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पानसरे यांच्या कामाचा परिघ अनेक वर्षे कामगारांच्या आर्थिक मागण्यांसाठी झगडणारा नेता, असा राहिला तरी त्याहून त्यांच्या सामाजिक कामाचा परिघ जास्त मोठा होता. ती अशी अगणित कामे करत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला सगळ्यात मोठा आधार हा पानसरे अण्णांचा होता. त्यामुळे या चळवळीतील कोणत्याही नव्या मोहिमेची सुरुवात कोल्हापुरातून होत असे. कारण एकतर येथील भूमी परिवर्तनाला साद देणारी आणि दुसरे असे की, पानसरे यांचे पाठबळ. त्यामुळे दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कार्याचा वसा उघड शत्रुत्व घेऊन कुणी पुढे नेला असेल, तर त्यात पानसरे यांचे नाव सगळ्यात अग्रभागी राहील. दाभोलकर यांचा खून सनातनी प्रवृत्तींनीच केला, असे ते जाहीरपणे सांगत होते. देशात सत्तांतर झाले आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यावर महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे जाहीरपणे उदात्तीकरण सुरू झाले. त्याबद्दल त्यांना प्रचंड राग होता. त्यामुळे गेल्या पाच-सात महिन्यांत ते कुठेही गेले, तर त्यांच्या भाषणात हाच मुद्दा प्रकर्षाने येत होता. गेल्या रविवारी चिंचवाड (ता. करवीर) येथे ग्रामीण साहित्य संमेलन झाले. त्यावेळी गावांत शाळकरी मुलींनी गांधीजींचे चित्र रांगोळीने रेखाटले होते. त्याचा संदर्भ घेत ते म्हणाले की, या देशात आणखी काही दिवसांनी अशी स्थिती येईल की, गांधीजींच्या ऐवजी नथुराम गोडसेची रांगोळी शाळांमध्ये काढली जाईल. नथुराम गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच कार्यकर्ता होता व त्याच विचाराचे सरकार देशात व राज्यातही सत्तेवर आल्याचे ते जाहीरपणे बोलत होते. दाभोलकर व पानसरे या व्यक्ती दोन; परंतु विचारधारा एकच. समाजाला पुढे नेणारी. विशिष्ट समाजाची वर्चस्वाची मक्तेदारी मोडून काढणारी. दाभोलकर यांना संपविले; परंतु त्यांचे मारेकरी कोण, याचा छडा आजपर्यंत लागला नाही. त्यामुळे धाडस वाढलेल्या प्रवृत्तींनीच दुसऱ्या दाभोलकरांवर असा भ्याड हल्ला केला.
पानसरे यांच्या आयुष्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. त्यांचा ऐन उमेदीतील तरणाबांड मुलगा अवि पानसरे हा २ आॅक्टोबर २००३ ला एकाएकी गेला. त्याची अंत्ययात्रा दुसऱ्या दिवशी निघाली. ती बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्षाच्या दारात आल्यावर पानसरे अंत्ययात्रेच्या वाहनावर चढले व मूठ आवळून त्यांनी आरोळी दिली. ‘कॉम्रेड अवि पानसरे का अधुरा काम कौन पुरा करेगा...!’ त्यावर गर्दीतून तितक्याच जोराने प्रतिसाद आला. ‘हम करेंगे.. हम करेंगे...’ अण्णांना त्यापासून नवी उर्मी मिळाली. एखाद्या योद्ध्यासारखा हा माणूस सगळे दु:ख पाठीवर टाकून पुन्हा समाजाच्या भल्यासाठी संघर्षास तयार झाला. त्यांचे वय ८१ वर्षे होते. हृदयरोग, मधुमेहसारखे आजार सोबत करत होतेच. परंतु, नियमित व्यायाम, आहारावर नियंत्रण व सतत कार्यमग्न, यामुळे या वयातही ते झपाटल्यासारखे काम करायचे. एकदा एक काम हाती घेतले की, ते पूर्ण होईपर्यंत त्यांना विश्रांती नसे. त्यांच्या डोक्यातून अनेक नवनवीन कल्पना येत असत. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जमलेल्या निधीतून त्यांनी कोल्हापुरातील चळवळीतील कार्यकर्त्यांची चरित्रे लिहिण्याचा उपक्रम राबविला. ते स्वत:ही एक कसदार लेखक होते. अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्याची त्यांना सवय होती. ‘शिवाजी कोण होता..’ हे पुस्तक ज्यांनी वाचले आहे, त्यांना त्याचा अनुभव नक्की येईल. त्यांचे वक्तृत्वही त्याच धाटणीतील होते. समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत, त्याला सहभागी करून ते बोलत असत. त्या अर्थाने त्यांच्याइतका चांगला ‘सोशल कम्युनिकेटर’ आता महाराष्ट्रात नाही. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही की, जिथे पानसरे अण्णांचे काही ना काही योगदान नाही. चळवळीतील कार्यकर्त्याला ‘अण्णा’ या दोन शब्दांचा जसा दरारा होता, त्याहूनही जास्त मोठा आधार होता. त्यांच्याकडे आपण गेल्यास काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास लोकांना वाटे. आंदोलन टोलचे असो की कोणतेही, त्यात अण्णांचा सहभाग हा त्याला आपोआपच नैतिकतेचे पाठबळ मिळवून देई. पानसरे चुकीचे काही करणार नाहीत, असे मोठ्या समाजाला वाटे, हेच त्यांचे बळ होते. गोवा मुक्ती आंदोलनापासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमा प्रश्न, रेशन धान्याच्या चळवळीपासून ते अगदी थेट पाईपलाईन योजनेपर्यंत शेकडो चळवळींत ते अग्रभागी राहिले.
काम कोणतेही असो, छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन ते पुढे जात. स्वच्छ चारित्र्य हा अत्यंत दुर्मीळ गुण त्यांच्याकडे होता. दोन वर्षांपूर्वी त्यांना ‘शाहू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या समारंभातही त्यांनी समाजाच्या दुटप्पी वागण्यावर बोट ठेवले. महाराष्ट्र पुरोगामी आहे, असे म्हणणे सर्वांनी त्वरित थांबविले पाहिजे आणि महाराष्ट्राला पुरोगामी करण्याच्या कार्यासाठी व्यापक व सखोल प्रबोधनाचे कार्य चिकाटीने करत राहिले पाहिजे, असा आग्रह ते सातत्याने धरत राहिले. ज्या शाहू महाराजांच्या भूमीने महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला समतेचा, पुरोगामित्वाचा विचार दिला, त्याच भूमीत पानसरे यांच्यासारख्या गोरगरिबांच्या नेत्यावर असा भ्याड हल्ला व्हावा, हे ही भूमी ते म्हणत तशी पुरोगामी राहिली नाही, याचाच दाखला देणारी घटना आहे. व्याख्यानमाला असो की सामाजिक चळवळ, ते लोकांना सतत एक आवाहन मनापासून करत. जे समाजाच्या भल्याचे आहे, ते आपण करत राहू, असा विश्वास ते लोकांना सतत देत. आजही त्यांचा तोच विचार पुढे नेण्याची खरी गरज आहे.
राजकीय कार्यकर्ते होणाऱ्यांच्या झुंडी तयार होत आहेत. कारण त्यापासून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काहीतरी लाभ होणार आहे. त्यास प्रतिष्ठा मिळणार आहे. त्यामुळे तिकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. परंतु, सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत काम करणे हे दिवसेंदिवस जिकिरीचे बनत चालले आहे. लोकांसाठी निष्ठेने, चारित्र्य स्वच्छ ठेवून व लोकांचाही विश्वास संपादन करून काम करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. अलीकडील काळात तो माझे ऐकत नाही ना, मग हाणा त्याला, मारा त्याला, ही दडपशाहीही वाढू लागली आहे. अशा काळात राज्यभरातील या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या दृष्टीने दाभोलकर व पानसरे हे आदराचे स्थान होते. ते आपल्या पाठीशी आहेत, हा लढायला बळ देणारा विश्वास होता. अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा चळवळीत काम करणाऱ्यांच्या वाटेला असे आयुष्य येऊ लागल्यावर समाजासाठी काम कोण करणार? असा प्रवाह बळावतो. अण्णांवरील हल्ल्यानंतर कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या मनाला हाच प्रश्न सतावत आहे.
-विश्वास पाटील, कोल्हापूर