“जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? CM शिंदेंशी मिलीभगत, OBC आरक्षण संपवायचा डाव”: लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:32 IST2024-06-27T16:30:49+5:302024-06-27T16:32:22+5:30
Laxman Hake News: शिंदे सरकार ओबीसींना डावलत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

“जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? CM शिंदेंशी मिलीभगत, OBC आरक्षण संपवायचा डाव”: लक्ष्मण हाके
Laxman Hake News: ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची चर्चा आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके दोघेही आक्रमक झाले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिलीभगत असल्याचा मोठा आरोप केला आहे. तसेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा हा डाव असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे काय राष्ट्रपती आहेत का देशाचे पंतप्रधान आहेत? जरांगे यांनी काय सभागृहात ठराव घेतला आहे का, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा. मनोज जरांगे नावाचा माणूस बेकायदेशीर घटनाविरोधी आरक्षण मागत आहे. ते कधीही मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्या जीवनात माती कालवण्याचं काम करू नये, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची मिलीभगत
फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची मिलीभगत आहे, असा गंभीर आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आम्ही अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करण्यासाठी आंदोलन करत आहोत. तानाजी सावंतसारखे मंत्री जरांगेच्या उपोषणाला भेट देतात आणि मी मराठा म्हणून आलो, असे बालिश विधान करतात. आपण १२ करोड जनतेचे मंत्री, मुख्यमंत्री आहोत हे विसरून जातात. शिंदे सरकार ओबीसींना डावलत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
दरम्यान, बेकायदेशीररीत्या कुणब्यांच्या नोंदी करून ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, याची आम्हाला खंत वाटते. २७-२८ वर्षांचे आमचे आरक्षण संपवण्याचा काम जरांगे नावाच्या बुजगावण्याच्या हातून होते आहे, अशी घणाघाती टीका लक्ष्मण हाकेंनी केली.