राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी; सर्वपक्षीय बैठकीत एकमताने ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:42 IST2023-11-01T13:41:52+5:302023-11-01T13:42:32+5:30
सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी; सर्वपक्षीय बैठकीत एकमताने ठराव मंजूर
मुंबई - मराठा आरक्षणावरून राज्यातील परिस्थिती चिघळत असताना या मुद्द्यांवर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. त्यात राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत एकमत करण्यात आले. या बैठकीत मराठा आरक्षणाविषयक ठराव मांडण्यात आला. त्यावर बैठकीतील सर्व नेत्यांनी स्वाक्षरी केली. जवळपास अडीच ते तीन तासानंतर ही बैठक संपली.
काय आहे ठराव?
सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत.
कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. हे पक्ष लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत. व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. याबाबत सर्वपक्षीय बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन सर्वपक्षीय बैठकीतून नेत्यांनी केले.
त्याचसोबत सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे असं आवाहन सर्वपक्षीय बैठकीतून नेत्यांनी केले आहे.
कोणी केली स्वाक्षरी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनिल परब, जयंत पाटील(शेकाप), सुनील प्रभू, सुनील तटकरे, प्रशांत इंगळे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, कपिल पाटील, राजू पाटील, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, रेखा ठाकूर, सुलेखा कुंभार, राजेंद्र गवई, गौतम सोनावणे, सचिन खरात, बाळकृष्ण लेंगरे, रवी राणा, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, संजय शिरसाट, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे या नेत्यांनी या ठरावावर सह्या केल्या आहेत.