Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज बचावात्मक आणि वाजवी; फडणवीसांचं सभागृहात लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:46 PM2023-12-08T12:46:16+5:302023-12-08T13:07:39+5:30

Maratha Reservation भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल सभागृहात लेखी उत्तर दिलं आहे.

Lathi charge on Maratha agitators was defensive devendra Fadnavis written reply in the House | Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज बचावात्मक आणि वाजवी; फडणवीसांचं सभागृहात लेखी उत्तर

Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज बचावात्मक आणि वाजवी; फडणवीसांचं सभागृहात लेखी उत्तर

नागपूर : राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा Maratha Reservation प्रश्न धुमसत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला असून मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं आहे. या उत्तरात फडणवीसांनी दिलेल्या माहितीने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण आंदोलनात करण्यात आलेला लाठीचार्ज हा बचावात्मक आणि वाजवी असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी आपल्या उत्तरात केला आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या लेखी प्रश्नोत्तरामध्ये आमदारांनी मराठा आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांबाबत गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे माहिती मागवली होती. या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "जालना जिल्ह्यातील सदर आंदोलनात हिंसक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत ७९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले आहेत. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने बळाचा वाजवी वापर केला. यामध्ये ५० आंदोलक जखमी झाले."

दरम्यान, आधी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आणि त्यानंतर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली, असा दावा मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक करत असताना गृहमंत्री फडणवीस यांनी मात्र आधी दगडफेक झाल्याने बचावात्मक पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगिल्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'गुन्हे मागे घेण्याचा निर्णय तपासणीअंती'

मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. मात्र याबाबत फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करत 'मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने तपासणी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल' असं म्हटलं आहे.

मराठा आंदोलनात काही राजकीय नेत्यांची संपत्ती जाळली का आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांच्या लेखी उत्तरात म्हटलं  आहे की, "मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पुणे शहर, सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली, अमळनेर, यवतमाळ, धाराशीव, नांदेड, परभणी , जालना, अहमदनगर या ठिकाणी शासकीय वाहनांवर दगडफेक, एसटी बसेसवर दगडफेक, घनसावंगी हद्दीत पंचायत समिती कार्यालय पेटवून देणे, तसेच विविध ठिकाणी जाळपोळ करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याच्या घटना घडल्या आहेत."
 

Read in English

Web Title: Lathi charge on Maratha agitators was defensive devendra Fadnavis written reply in the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.