संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले, सर्व पुरावेही दाखवले; नामदेवशास्त्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:27 IST2025-02-02T15:21:37+5:302025-02-02T15:27:14+5:30

Late Santosh Deshmukh Family Meet Bhagwangad Mahant Namdev Shastri: वैभवी देशमुख, धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. पुरावे दाखवले आणि गाऱ्हाणे मांडले.

late santosh deshmukh family with dhananjay deshmukh and vaibhavi deshmukh meet bhagwangad mahant namdev shastri | संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले, सर्व पुरावेही दाखवले; नामदेवशास्त्री म्हणाले...

संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले, सर्व पुरावेही दाखवले; नामदेवशास्त्री म्हणाले...

Late Santosh Deshmukh Family Meet Bhagwangad Mahant Namdev Shastri: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. या प्रकरणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवान गडावर पोहोचले. 

नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर करतानाच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी भगवान गडावर जाण्याचा निश्चय बोलून दाखवला. तसेच सर्व पुरावे महाराजांसमोर ठेवणार आहे आणि आता त्यांच्याचकडे न्याय मागणार आहे, असा निर्धार बोलून दाखवला होता. त्यानुसार, संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले. धनंजय देशमुख यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्यासमोर सगळी कागदपत्रे, पुरावे ठेवले. यावेळी नामदेवशास्त्री यांनी संतोष देशमुख कुटुंबाला शब्द दिला. 

धनंजय देशमुखांनी सगळ्यांसमोर नामदेवशास्त्रींना पुरावे दाखवले

धनंजय देशमुख यांच्यासह वैभवी देशमुख यांनी नामदेवशास्त्रींची भेट घेताना मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सगळ्यांसमोर धनंजय देशमुख यांनी थेटपणे नामदेवशास्त्रींसमोर पुरावे देताना त्यांची बाजू सांगितली. देशमुख कुटुंबाने कधी जातीवाद केला नाही. देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत आहे. प्रामाणिकपणे सांगतो. मनोहर मुंडेंचे चार मुले होती. दोन मुले पुण्यात होते. दोन मुले इथे. त्यांनी जे पिकवले ते आम्ही खातो. देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्याच्या हत्येनंतर दिसले असते. दलित बांधावाला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेले होते. आमची कोणतीही गुन्हेगारी नाही. १५ वर्ष सरपंच राहिलेल्या माणसाशी या लोकांनी संपर्क साधायला हवा होता. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे. ज्याला आरोपींची बाजू घ्यायची त्यालाच जातीयवादाचा अंश येत आहे. आम्ही सर्व दाखवलं आहे. यांच्या कार्यालयात बसायचे. त्यांच्या गाडीत फिरायचे, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.

न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचं ठरवू नका

या ठिकाणी आरोपींबाबत बोलताना माझ्या अंगावर शहारे येत आहेत. या प्रकरणाबाबत बोलण्याची ही जागा नाही. गादीसमोर बोलताना खूप त्रास होत आहे. योग्य माहिती घेतल्याशिवाय बोलणे योग्य नाही. गादीसमोर येऊन गडावरून परत जाताना चांगल्या गोष्टींची शिदोरी आपण नेतो. पण आरोपींची मानसिकता तपासायला हवी, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. 

धनंजय देशमुख यांनी पुरावे दाखवल्यावर नामदेवशास्त्री काय म्हणाले?

भगवान बाबाला मानणारे देशमुख कुटुंब आहे. जातीय सलोखा या गावात आहे. यापूर्वी किती वेळा गडावर आले, हे त्यांनी दाखवले. भगवान गड तुमच्या पाठीशी कायम राहील, ही ग्वाही देतो. आरोपींची पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले. धनंजय यांचे म्हणणे आहे की, याला जातीयवादाचे स्वरुप देऊ नका. भगवान गड कायम स्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहील. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते त्यांनी दाखवले. संतोष अण्णाने किती काम केले हे त्यांनी दाखवले. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणे आहे. आम्ही बसून बोलू. त्यांना दोन घास खाऊ घालू. त्यांना प्रसाद देऊ. संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल, या शब्दांत महंत नामदेवशास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आश्वासन दिले. 
 

Web Title: late santosh deshmukh family with dhananjay deshmukh and vaibhavi deshmukh meet bhagwangad mahant namdev shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.