Lata Mangeshkar thanked Thackeray Government over complete her wish | गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...”

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...”

मुंबई – भारतरत्न लता मंगशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे सरकारने राज्यात मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत विश्वविद्यालय स्थापन करणार असल्याची घोषणा केली, या निर्णयाचं लता मंगेशकर यांनी आभार मानले आहेत. माझ्या मनात फार काळापासून एक इच्छा होती, राज्यात एक जागतिक दर्जाचे संगीत विद्यालय असावे जिथे भारतातील तसेच सर्व पाश्चात्य देशातील अनेक गायन नृत्य वादन प्रकारांचा समावेश असावा असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच या विश्वातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा ही इच्छा मी चि. आदित्य ठाकरे याला एकदा सांगितली आणि आदित्यने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि सहकाऱ्यांनी यावर निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने माझ्या वाढदिवसानिमित्त मला सुंदर भेट दिली अशा शब्दात लतादिदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्याचसोबत माझ्या वडिलांच्या नावाने जागतिक दर्जाचे मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा केली. मला या निर्णयाचा मनापासून आनंद होत आहे. मी या सर्वांचे आणि सरकारचे सुरेल निर्णयाबद्दल मन:पूर्वक आभार मानते असंही लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उदय सामंत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगितकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे  देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारकडून लता दीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्यांनाही हा निर्णय नक्कीच आवडेल. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील. असे सांगून उदय सामंत यांनी  लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर लता मंगेशकर यांनीही आनंद व्यक्त केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lata Mangeshkar thanked Thackeray Government over complete her wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.