बाबासाहेबांच्या वारसांना ‘तो’ भूखंड केला परत; अतिक्रमणांसाठी आदर्श कार्यपद्धती : चंद्रशेखर बावनकुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 08:12 IST2025-07-12T08:11:40+5:302025-07-12T08:12:14+5:30

काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी  विधानसभेत डोंबिवलीतील जमिनीचा भूमाफियांनी ताबा घेतल्याबाबत प्रश्न विचारला होता.  त्यावर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

Land seized by builder returned to Babasaheb Ambedkar's heirs, says Chandrashekhar Bawankule | बाबासाहेबांच्या वारसांना ‘तो’ भूखंड केला परत; अतिक्रमणांसाठी आदर्श कार्यपद्धती : चंद्रशेखर बावनकुळे 

बाबासाहेबांच्या वारसांना ‘तो’ भूखंड केला परत; अतिक्रमणांसाठी आदर्श कार्यपद्धती : चंद्रशेखर बावनकुळे 

मुंबई : कल्याणमधील गोळवली  परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस यशवंत भीमराव आंबेडकर आणि  प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे तसेच त्यांच्या ताब्यातील बिल्डरने बळकावलेली जमीन वारसांना परत करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात   दिली. 

कोणत्याही स्थितीत डॉ. आंबेडकर कुटुंबाची ही जमीन अन्य कोणालाच वापरता येणार नाही. तसे झाल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.  काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी  विधानसभेत डोंबिवलीतील जमिनीचा भूमाफियांनी ताबा घेतल्याबाबत प्रश्न विचारला होता.  त्यावर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई
भाजपचे आमदार योगेश सागर यांनी सरकारी जागांवर अतिक्रमण होत असेल तर  त्या प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न केला. त्यावर, ज्यांची जागा आहे त्यांनी तिचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे.  मात्र महसूल विभागातील काही कर्मचारी सहभागी झालेले असतील, तर अशा दोषींवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक कायद्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त 
बावनकुळे म्हणाले,  गोळवळीतील जागा ललित महाजन आणि तनिष्का रेसिडन्सीने अनधिकृतरित्या ताब्यात घेऊन त्यावर ७२ सदनिका तसेच आठ व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम उभारले. ही संपूर्ण जागा रिकामी करून संबंधित अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. आता ही जागा यशवंत भीमराव आंबेडकर आणि त्यांचे वारस प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे परत करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

Web Title: Land seized by builder returned to Babasaheb Ambedkar's heirs, says Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.