10 लाखांच्या कर्जासाठी चार लाख गमावले, नातेवाईकांकडूनही घेतले कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 22:25 IST2017-10-05T22:25:21+5:302017-10-05T22:25:54+5:30
दहा लाखांचे कर्ज झटपट मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले चार लाख रुपये गमावले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

10 लाखांच्या कर्जासाठी चार लाख गमावले, नातेवाईकांकडूनही घेतले कर्ज
नागपूर : दहा लाखांचे कर्ज झटपट मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले चार लाख रुपये गमावले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. टिना प्रभूदयाल उईके (वय २८) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. त्या रमाईनगरात राहतात. १ सप्टेंबरला त्यांनी एका हिंदी दैनिकात जाहिरात वाचली. केवळ मार्कशिटच्या आधारावर कर्ज दिले जाते, असे या जाहिरातीत नमूद होते.
वृद्ध आईवडिलांच्या उपचारासाठी टिना यांना १० लाखांची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी जाहिरातीत नमूद असलेल्या ८९५५२ ६३०५३, ९३५२१ ७८५९७, ९३५१३ ६८५६, ९३०९४६४७०६ आणि ९३१४८४४७९७ या मोबाईल क्रमांकांवर १ सप्टेंबरपासून संपर्क केला. आरोपींनी सहजपणे दहा लाखांचे लोन मंजूर करून देण्याची बतावणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या वेळी विविध कारणे पुढे करून टिना यांना त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली. टिना यांचे आजारी वडील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या खात्यात पेंशनची काही रक्कम होती. ही रक्कम काही दागिने आणि नातेवाईकांकडून उधार घेऊन दहा लाखांचे कर्ज मिळवण्याच्या नादात टिना यांनी आरोपींच्या खात्यात ३ लाख, ९० हजार, ९०० रुपये जमा केले. आता मिळेल, उद्या कर्जाची रक्कम मिळेल या आशेवर असलेल्या टिना यांना आरोपींनी कर्जाची रक्कम दिली नाही.
उलट ते प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून रक्कम मागत होते. दुसरीकडे चार-आठ दिवसांच्या मुदतीवर नातेवाईक, ओळखीच्यांकडून रक्कम घेतली परंतू चार आठवड्यांपेक्षा जास्त अवधी होऊनही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे घेणेक-यांनीही टिनामागे तगादा लावला. दोन्हीकडून कोंडी झाल्यामुळे रडकुंडीला आलेल्या टिना यांनी बुधवारी जरीपटका पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तेल गेले, तूप गेले अन् ...
साधारण कुटुंबातील गृहिणी असलेल्या टिना यांनी आईवडीलांच्या काळजीतून कर्जाची रक्कम घेण्यासाठी हा सर्व प्रकार केला. त्यांना कर्ज तर मिळालेच नाही. उलट वृद्ध वडीलांच्या खात्यात असलेली सर्वच्या सर्व रक्कम ठगबाजांच्या हातात गेली. आप्तस्वकीयांचे कर्जही झाले. आता ते कसे परत करायचे, असा प्रश्न टिना यांना पडला आहे.