तारीख ठरली! लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट; थेट खात्यात मदतीचा हप्ता, प्रक्रियेस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:17 IST2025-08-06T13:13:38+5:302025-08-06T13:17:12+5:30

Ladki Bahin Yojana: राज्य शासनाने जुलै २०२५ महिन्याचा ₹१५०० हप्ता दिनांक ९ ऑगस्ट २०२५ पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ladki bahin yojana july 2025 installment likely credit in account on raksha bandhan 2025 direct payment process be start | तारीख ठरली! लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट; थेट खात्यात मदतीचा हप्ता, प्रक्रियेस सुरुवात

तारीख ठरली! लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट; थेट खात्यात मदतीचा हप्ता, प्रक्रियेस सुरुवात

Ladki Bahin Yojana:राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹१५०० मासिक मदत जमा केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता, राज्य शासनाने जुलै २०२५ महिन्याचा ₹१५०० हप्ता दिनांक ९ ऑगस्ट २०२५ पूर्वी  लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने एकूण ₹७४६ कोटींचा निधी वितरित केला आहे. योजनेच्या निधी वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून, पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतरण सुनिश्चित केले गेले आहे.

या निर्णयाचे  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मनःपूर्वक स्वागत करताना नमूद केले की, हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी टप्पा आहे. तो मानवी मूल्यांशी जोडलेला आणि सामाजिक समतेची जाणीव असलेला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी यासोबतच सांगितले की, आम्ही आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यातून खातेदार महिलांना कर्ज, व्यवसाय आणि बाजारपेठेची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. महिलांचे बचत गट, स्वयंरोजगार आणि उत्पादन विक्री यांना चालना देण्याच्या दिशेने हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पावले टाकता येतील. याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ज्या बॅंका लाडक्या बहिणी तसेच, महिलांचे बचत गट सहकार्य करित असतील त्यांच्याबरोबर कार्यक्रम आखण्याचा निर्णय शिवसेनेच्यावतीने केला गेला आहे.  

महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या या दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक निर्णयाचे डॉ. गोऱ्हे यांनी आभार मानले. त्यांनी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाचे व महिलांविषयी असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना, काही राजकीय टीकाकारांकडून "ही योजना बंद होणार" असा चुकीचा प्रचार केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात लाभार्थी महिलांचा या योजनेवर ठाम विश्वास आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यात आत्मविश्वास आणि आर्थिक सक्षमता वाढली आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट सांगितले. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ऑगस्ट २०२५ मधे एक वर्ष पूर्ण होत आहे त्या धर्तीवर या योजनेतील प्राप्त निधीचा वापर, त्याचे परिणाम आणि महिलांमध्ये झालेला सकारात्मक बदल याचा सखोल अभ्यास करून सरकारने सदर योजनेची गरज का आहे? याबाबत प्रभावी अहवाल तयार करण्याची गरज डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. विशेषतः, योजनेसाठी ना आदिवासी विकास विभागाचा, ना सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरण्यात आलेला आहे. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद असून तो केवळ महिलांच्या शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी वापरला जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आदिवासीं व मागासवर्ग विभागाचा निधी वळवल्याचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्यांची राजकीय इच्छाशक्ती व महिलांविषयीची बांधिलकी हे यशस्वी अंमलबजावणीमागचे प्रमुख कारण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या सहकार्यामुळे योजना राज्यभर पोहोचली आहे. शेवटी, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “ही योजना त्यांच्या जीवनात नवे स्वप्न, नवे संधी आणि नवा आत्मविश्वास घेऊन येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक दर्जात वाढ घडवणाऱ्या या योजनेचा पुढील टप्पा हा व्यावसायिक,सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा ठरेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title: ladki bahin yojana july 2025 installment likely credit in account on raksha bandhan 2025 direct payment process be start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.