मुंडेंनंतर भाजपाकडे नेतृत्वाचा अभाव - आऱआऱ पाटील
By Admin | Updated: October 8, 2014 03:58 IST2014-10-08T03:58:01+5:302014-10-08T03:58:01+5:30
दिवंगत गोपीनाथ मुंडे आज असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला येण्याची गरज भासली नसती
मुंडेंनंतर भाजपाकडे नेतृत्वाचा अभाव - आऱआऱ पाटील
उमरी (जि.नांदेड) : दिवंगत गोपीनाथ मुंडे आज असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला येण्याची गरज भासली नसती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणणे म्हणजेच मुंडेंनंतर राज्यातील भाजपाकडे नेतृत्वाचा अभाव असल्याचे स्पष्ट होते, असा टोला माजी गृृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी येथील सभेत लगावला़
नायगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते़ तरूणांना रोजगाराचे आमिष दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून असंख्य बेरोजगारांचे लोंढे महाराष्ट्रात येत आहेत़ त्यांच्या तीन महिन्यांच्या काळातच शेतमालाचे भाव कधी नव्हे इतके घसरले़ भारतीय सीमेवरून पाकिस्तानी सैनिकांनी वीर जवानांचे शीर नेल्यावर भाजपा व मोदींनी कांगावा केला़ जवानों के सीर वापस लायेंगे, अशी भाषा केली़ प्रत्यक्षात त्यांनी नवाज शरिफ यांना भारतात आमंत्रित केले. काळा पैसा आणण्याची भाषा त्यांनी केली़ मात्र एक दमडीही आणली नाही़ चीनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर असताना चिनी सैन्य भारताच्या हद्दीत घुसले, अशी टीकाही त्यांनी केली़ (वार्ताहर)