महाराष्ट्रात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणासह संबंधित विभागांनी आयोजनाची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले की, कुंभमेळा आयोजनासाठी प्राधिकरणास सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे प्राधिकरणाने प्राधान्याची कामे आणि ती पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी निश्चित करावा. त्यानुसार कामांची प्रशासकीय मान्यता, निविदा आणि कार्यादेश प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. कुंभमेळा यशस्वीरित्या पार पडण्याच्या दृष्टीने दळणवळण, परिवहन, पाणी पुरवठा, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन, राहण्याची सोय, आरोग्य व्यवस्था, विद्युत व्यवस्था आदी महत्त्वाची कामे सर्व संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण करावीत. यासाठी विभागांनी आणि प्राधिकरणाने विहित मार्गाने निधीची तरतूद होण्यासाठीची प्रक्रिया तात्काळ करावी.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियमानुसार प्राधिकरणाने आवश्यकतेनुसार शिखर समिती आणि मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन कुंभमेळा नियोजनाचा आराखडा प्रसिद्ध करावा. त्यानुसार प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारितील कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. केंद्र सरकारच्या यंत्रणांमार्फत जी कामे सुरू आहेत त्यासाठी प्राधिकरणाने केंद्रीय यंत्रणांसमवेत समन्वय ठेवावा. कुंभमेळा परिसर मोठा असल्याने आणि नाशिकबाहेरील अनेक कर्मचारी कामासाठी येणार असल्याने सर्व यंत्रणांच्या सोयीसाठी लहान लहान झोन तयार करुन त्यास नावे अथवा क्रमांक द्यावेत. कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा नियमित आढावा आणि देखरेखीसाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात यावे, असे निर्देशही मुख्य सचिव राजेश कुमार यांनी यावेळी दिले.
यावेळी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत त्याचप्रमाणे नाशिक येथून विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.
Web Summary : Chief Secretary Rajesh Kumar directed officials to complete Kumbh Mela preparations on schedule for the 2027-28 Nashik-Trimbakeshwar event. He emphasized timely completion of essential tasks like infrastructure, water supply, and waste management, urging coordination and fund allocation.
Web Summary : मुख्य सचिव राजेश कुमार ने अधिकारियों को 2027-28 नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभ मेले की तैयारी समय पर पूरी करने का निर्देश दिया। उन्होंने बुनियादी ढांचे, जलापूर्ति और अपशिष्ट प्रबंधन जैसे आवश्यक कार्यों को समय पर पूरा करने, समन्वय और धन आवंटन पर जोर दिया।