कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्यात नेण्याचा डाव फसला : गाळवणकर

By Admin | Updated: October 16, 2014 00:07 IST2014-10-15T22:45:21+5:302014-10-16T00:07:00+5:30

कोकण रेल्वेचा वर्धापन दिन महाराष्ट्रात साजरा करण्याऐवजी गोव्यात

Konkan Railway's headquarters in Goa is unsuccessful: Galvankar | कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्यात नेण्याचा डाव फसला : गाळवणकर

कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्यात नेण्याचा डाव फसला : गाळवणकर

कुडाळ : कोकण रेल्वेचा वर्धापन दिन महाराष्ट्रात साजरा करण्याऐवजी गोव्यात साजरा करण्याच्या निमित्ताने कोकण रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रातून गोव्यात हलविण्याचा भानुदास तायल यांचा डाव के. आर. सी. एप्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी यांच्या हस्तक्षेपामुळे फसला, अशी माहिती केआरसी एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दीड महिन्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर करून १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्याचे आदेश काढले. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाला १५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यात मतदान आहे, याची कल्पना होती. परंतु १५ आॅक्टोबर हा दिवस गेली २० वर्षे कोकण रेल्वेचा वर्धापन दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असताना तसेच यावर्षी १५ आॅक्टोबर या दिवशी महाराष्ट्रात मतदान असल्याचे माहीत असतानाही कोकण रेल्वेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक भानुदास तायल यांनी त्याच दिवशी मडगाव येथे कोकण रेल्वेचा वर्धापन साजरा करण्याचे जाहीर केले. त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला.
सुभाष मळगी यांनी १५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान असल्यामुळे त्याच दिवशी मडगाव येथे वर्धापन दिन साजरा करणे चुकीचे असल्याचे निवडणूक आयोगाला कळविले. कोकण रेल्वे प्रशासनाला हा निर्णय रद्द करण्याबाबत पत्र दिले. कारण कोकण रेल्वेचा वर्धापन दिन गोव्यात साजरा झाल्यास महाराष्ट्रातील कामगारांना गोव्यात उपस्थित रहावे लागेल. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण रेल्वे कामगारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार नाही. मतदानादिवशी अशाप्रकारचा निर्णय घेणे चुकीचे असल्याने या विषयामध्ये निवडणूक आयोगाने लक्ष घातल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने १५ आॅक्टोबर रोजी मडगाव येथे वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय रद्द केला. केआरसी एम्प्लॉईज युनियनच्या या भूमिकेमुळे कोकण रेल्वे कामगारांना मतदान करण्याचा हक्क मिळाला. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तायल यांचा महाराष्ट्राविषयी असलेला व्देष पुन्हा पहायला मिळाला असल्याचे गाळवणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Konkan Railway's headquarters in Goa is unsuccessful: Galvankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.