कोल्हापूर-सांगली तंबाखू अन् कॅन्सरचेही आगर

By Admin | Updated: February 21, 2015 01:51 IST2015-02-21T01:51:10+5:302015-02-21T01:51:25+5:30

सर्वाधिक उत्पादन : खाद्यात समावेश असल्याने बंदीत अडचणी, प्रबोधनाचाच प्रभावी ‘उतारा’

Kolhapur-Sangli Tobacco and Cancer | कोल्हापूर-सांगली तंबाखू अन् कॅन्सरचेही आगर

कोल्हापूर-सांगली तंबाखू अन् कॅन्सरचेही आगर

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -- राज्यातील एकूण तंबाखू उत्पादनापैकी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत निम्म्याहून अधिक उत्पादन होते. या दोन जिल्ह्यानजीकच्या कर्नाटकातील निपाणी परिसरातही तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने उत्पादनात तसेच तंबाखू खाण्याच्या व्यसनातही या परिसरातील लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे साहजिकच तोंडाच्या कॅन्सरचे या रुग्ण दोन जिल्ह्यातच अधिक असल्याचे कॅन्सरतज्ज्ञांचे मत आहे.
माजी गृहराज्यमंत्री आर. आर. पाटील(आबा) यांचा तंबाखूच्या व्यसनामुळे कॅन्सरने मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यात ‘तंबाखू बंदी’ची घोषणा केली आहे. बंदी झालीच तर अंमलबजावणीच्या पातळीवर उदासीनता असते. त्यामुळे शेवटी प्रभावी प्रबोधनातूनच तंबाखूवर उतारा शक्य आहे.
पोषक हवामान आणि अन्य पिकांपेक्षा चार पैसे अधिक मिळत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि कर्नाटकातील निपाणी परिसरात अनेक वर्षांपासून शेतकरी तंबाखूचे पीक घेतात. कच्चा माल उपलब्ध होत असल्याने गुटखा, सुवासिक तंबाखू, बिडी तयार करण्याच्या उद्योगांची संख्या या परिसरात लक्षणीय आहे. परिणामी, खेड्या-पाड्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
शहरातील कामगार, चालक व अन्य कष्टाची कामे करणारे तंबाखूच्या आहारी जात आहेत. याशिवाय फॅड, फॅशन, अनुकरण म्हणून कॉलेजची मुलेही गुटखा, सुवासिक तंबाखू, मावा खात आहेत. कॉलेजजीवनात गुटख्याने सुरुवात केली. शिक्षण संपल्यानंतर तंबाखू चोळू लागला, अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला आहेत. बडा पगार असलेले व काही उच्चवर्गीय सिगारेटचा धूर काढत असतात. परिणामी तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट यांचा आरोग्यावर अतिशय घातक परिणाम जाणवत आहे.
तंबाखू खाणाऱ्यांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना तोंडाचा कॅन्सर होत असल्याचे पुढे आले आहे. तोंडाचा कॅन्सर झालेले सरासरी पन्नास टक्के रुग्ण वर्षाच्या आता दगावत आहेत, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. इतके गंभीर परिणाम होत आहेत. ‘आबां’च्या मृत्यूनंतर ‘तंबाखूबंदी’ची घोषणा करण्यापर्यंत शासनाने मजल मारली आहे. अजून त्यावर विधी विभागाचे मत घ्यावयाचे आहे. तंबाखूचा समावेश खाद्यपदार्थांमध्ये आहे. त्यामुळे सर्व अडथळे पार करीत बंदी घातली तरी अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही. गुटखा आणि सुवासिक तंबाखूवरील बंदीचे असेच झाले आहे.

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात जिल्ह्यात १९९६ पासून चळवळ राबवीत आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाऊन जागृती करीत आहोत. प्रत्येक वर्षी जागृतीची मोहीम व्यापकपणे राबविली जात आहे. केवळ बंदीने कोणतेही व्यसन सुटत नाही. मानसिक निर्धार आवश्यक आहे. जागृती, दुष्परिणामांची जाणीव करून दिल्यानंतर तंबाखूसारख्या व्यसनापासून दूर होणे शक्य आहे.
- दीपक देवलापूरकर,
अध्यक्ष, जनस्वास्थ्य संस्था


आकडे बोलतात
कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात १५०० हेक्टर, तर सांगली जिल्ह्यात ४५० हेक्टर क्षेत्रात प्रतिवर्षी सरासरी तंबाखूचे पीक घेतले जाते. सुमारे २२०० टन तंबाखू उत्पादन होते. राज्यातील अन्य जिल्ह्यात १०० ते २०० हेक्टरच्या जवळपास तंबाखूची लागवड होते.


पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, आदी जिल्ह्यांत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे प्रत्येक महिन्याला कमीत कमी ३०० ते ४०० जणांना नव्याने तोंडाचा कॅन्सर होत आहे. लागण होण्यामध्ये ७० टक्के तरुण आहेत, ही बाब चिंताजनक आहे. - डॉ. सूरज पवार, कॅन्सरतज्ज्ञ

Web Title: Kolhapur-Sangli Tobacco and Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.