कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 06:16 IST2025-12-19T06:15:09+5:302025-12-19T06:16:07+5:30
नामुष्की : वर्षभरात अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांनी गमावले पद, मुंडेंनंतर पायउतार होणारे कोकाटे दुसरे

कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
मुंबई/नाशिक : सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले बिनखात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठविला; राज्यपालांनी तो स्वीकारला. कोर्टाने अटक वॉरंट बजावल्यानंतर कोकाटेंकडील क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही खाती काढून घेतली होती.
सूत्रांनी सांगितले की, कोकाटे यांना राजीनामा देण्यास अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. कोकाटे यांची आमदारकी आपोआप रद्द झालेली आहे. त्यांना मंत्रिपदी ठेवणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांचेही म्हणणे होते. त्यामुळे कोकाटे यांना राजीनाम्याशिवाय पर्याय राहिला नाही.
राजीनामा सादर केला आहे... तो स्वीकारण्यात यावा
कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राजीनामा पत्र लिहिले आणि ते त्यांचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवून दिले. अजित पवार यांनी ते फडणवीस यांच्याकडे पाठविले. सोबत स्वतःचे एक पत्रही जोडले. 'जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान राखून आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी लेखी विनंती अजित पवार यांनी फडणवीस यांना केली. त्यावर फडणवीस यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवून दिला, राज्यपालांनी तो स्वीकारला आहे.
कोर्टापुढे त्वरित हजर करा
जिल्हा व सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना २ वर्षांची सवत्तमजुरी व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक येथील १० वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांनी दोघांच्या नावे अजामीनपात्र वॉरंट काढले. या वॉरंटमध्ये पोलिस आयुक्त यांना या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या आरोपींना न्यायालयापुढे त्वरित आणावे, असा हुकूम करण्यात आला.
वॉरंटची अंमलबजावणी
या वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला दिले. यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी युनिट-१ च्या पथकाला पाचारण केले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून पथक मुंबईकडे निघाले.
सभागृहात रमीचा खेळ अन् वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत
विधान परिषद सभागृहात मोबाइलवर रमी खेळणे आणि वादग्रस्त विधाने केल्याने टीकेची झोड उठल्यानंतर कोकाटे यांचे कृषी मंत्रिपद काढून घेतले होते. त्यांना क्रीडा मंत्रिपद देण्यात आले. आज त्यांना तेही गमवावे लागले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील एक वर्ष जुन्या मंत्रिमंडळात राजीनामा द्यावे लागलेले कोकाटे हे दुसरे मंत्री ठरले आहेत. या आधी तेव्हाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. मुंडे आणि कोकाटे हे दोघेही अजित पवार गटाचे आहेत.
आज हायकोर्टात सुनावणी
नाशिकच्या न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या या याचिकेवर उद्या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत उच्च न्यायालय काय निर्णय देते यावर पुढील दिशा ठरेल.
नाशिक पोलिसांचे पथक लीलावती रुग्णालयात तळ ठोकून
मुंबई : नाशिक पोलिस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल तसेच अधिकारी, कर्मचारी यांचे पथक रात्री साडेदहा वाजता वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाले. वांद्रे पोलिसांत नोंद करत अटक वारंट घेऊन हे पथक कोकाटे दाखल असलेल्या लीलावती रुग्णालयात धडकले. तेथे डॉक्टरांशी चर्चा करून अटकेबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. प्रकृती स्थिर नसल्याने कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांच्या वार्डबाहेर पोलिस पथक तैनात असेल, असेही सूत्रांनी सांगितले
माणिकराव कोकाटे यांच्यावर सिटी अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांच्या हृदयाशी संबंधित रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम डिपॉजिट दिसले आहे. त्यामुळे आता त्यांची नियमित अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करायची की नाही, याचा निर्णय उद्या घ्यावा लागणार असल्याचे मत हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सुरेश विजन यांनी दिले आहे. कोकाटे यांच्या आरोग्याची सगळी माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे.
डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती हॉस्पिटल