कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 06:30 IST2025-12-23T06:30:34+5:302025-12-23T06:30:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अजित पवार गटाचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती ...

कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अजित पवार गटाचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांची आमदारकी तूर्त तरी वाचली आहे. सदनिका प्रकरणात नाशिकच्या न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानेही कोकाटेंची शिक्षा कायम ठेवली होती.
न्यायालय काय म्हणाले?
या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवता येणार नाही. शिक्षा म्हणजे बदला नाही तर ती सुधारण्याची दिलेली संधी असते. सोमवारी ही याचिका सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या पीठाकडे आली असता न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली; पण त्यांना कोणतेही लाभाचे पद स्वीकारता येणार नाही, असे स्पष्ट केले.
बनावट कागदपत्रे देऊन सदनिका लाटल्याचा गुन्हा
माणिकराव कोकाटे यांनी १९८९ ते १९९२ दरम्यान सरकारी गृहनिर्माण योजनेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. ही योजना समाजातील कमकुवत घटकांसाठी होती आणि केवळ ३०,००० रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न नसलेल्या पात्र व्यक्तींनाच पात्र मानले जात असे.
कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांनी त्यांचे उत्पन्न ३०,००० रुपयांपेक्षा कमी असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्या आधारावर त्यांनी दोन सरकारी सदनिका मिळवल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला होता.