‘ए आय’ कसे करणार पाेलिसांचे काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:45 IST2025-03-16T12:43:52+5:302025-03-16T12:45:42+5:30

कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक प्रणालीमुळे कोणत्याही गुन्ह्याचा तपास वेगवान, अधिक अचूक होत आहे. पोलिस तपासात हे तंत्रज्ञान एक क्रांतिकारी भूमिका बजावत आहे. भविष्यात ही प्रणाली गुन्हेगारांचा वेगाने शोध घेण्यास मदत करू शकते. 

Know about How will AI do police work | ‘ए आय’ कसे करणार पाेलिसांचे काम?

‘ए आय’ कसे करणार पाेलिसांचे काम?

डॉ. अमेय पांगारकर, एआय तज्ज्ञ -

भविष्यातील सत्य घटनेवर आधारित : मुंबईच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास एक गुन्हा घडला. एका नामांकित व्यावसायिकावर हल्ला झाला आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांसाठी ही एक मोठी आव्हानात्मक केस ठरली. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने तपासाची दिशा पूर्णतः बदलली.

ज्या चौकात गुन्हा घडला तिथे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पोलिसांनी त्वरित त्यांचे फुटेज ताब्यात घेतले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा पाहून प्रत्येक फ्रेम तपासणे जवळ जवळ अशक्य होते. इथेच एआय प्रणालीचा वापर करण्यात आला. एआयवर आधारित चेहरा ओळख प्रणालीने संशयिताच्या हालचाली टिपल्या आणि तो कोणत्या दिशेने निघाला याचा अंदाज घेतला. यासोबतच, गुन्ह्याच्या वेळी वापरण्यात आलेल्या मोबाइल टॉवर्समधून लोकेशन डेटा गोळा करण्यात आला आणि संभाव्य संशयिताच्या हालचाली ट्रॅक करण्यात आल्या.

एआय आधारित विश्लेषणामुळे गुन्हेगाराचा प्रवास, त्याचे संभाव्य ठिकाण आणि त्याच्या नेहमीच्या सवयी यांचा अभ्यास करता आला. या डेटाच्या आधारे पोलिसांनी संभाव्य गुन्हेगाराची ओळख पटवली आणि त्याचबरोबर तो कुठे सापडेल याचा अंदाज वर्तवता आला. अवघ्या २४ तासांत त्याला अटक करण्यात यश मिळवले. यात आणखी प्रगत एआय प्रणालींचा वापर केला गेला. मशीन लर्निंग अलगोरिदम्सच्या मदतीने संशयिताच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित तुलना करण्यात आली. तसेच, एआय पॉवर्ड बिहेव्हरल ॲनालिसिसच्या मदतीने संशयिताचा हालचालींचा नकाशा तयार करण्यात आला आणि त्याच्या मागील गुन्हेगारी इतिहासाचा अभ्यास करण्यात आला.

आजच्या काळात पोलिसांना गुन्हेगारी शोधण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गुन्ह्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगार ओळखणे कठीण झाले आहे. 

डेटा ओव्हरलोड हा मोठा प्रश्न आहे - हजारो तासांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून उपयुक्त माहिती शोधणे वेळखाऊ प्रक्रिया ठरते. तसेच, मानवी संसाधनांची कमतरता, पोलिस दलातील अपुरी संख्या आणि वाढत्या गुन्ह्यांच्या तुलनेत तांत्रिक कौशल्य असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने तपासाची गती मंदावते. सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे डिजिटल फसवणूक, बनावट ओळखी आणि हॅकिंगच्या गुन्ह्यांचा मागोवा घेणे कठीण होत आहे. याशिवाय, डेटा गोपनीयता आणि कायदेशीर मर्यादा या तांत्रिक प्रगतीसमोर मोठ्या अडचणी ठरू शकतात. 

यावरून स्पष्ट होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता पोलिस तपासात एक क्रांतिकारी भूमिका बजावत आहे. भविष्यकाळात आणखी सुधारित एआय प्रणाली पोलिसांना गुन्हेगारांचा वेगाने शोध घेण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, एआयची प्री-डिक्टिव्ह पोलिसिंग प्रणाली विशिष्ट भागांमध्ये गुन्ह्यांची शक्यता ओळखून पूर्वनिर्धारित गस्त घालण्यास मदत करू शकते. तसेच, नॅचरल लर्निंग प्रोसेसिंग आधारित प्रणाली सोशल मीडिया किंवा कॉल डेटा विश्लेषण करून संशयास्पद संवाद टिपू शकते.

डीप लर्निंग मॉडेल्सच्या मदतीने गुन्हेगारांच्या हालचाली आणि सवयी ओळखून भविष्यातील गुन्ह्यांची शक्यता अंदाजे वर्तवली जाऊ शकते. यामुळे पोलिसांना गुन्हा घडण्याआधीच संशयितांवर लक्ष ठेवता येईल. एआय इनेबल्ड सर्व्हेलन्स सिस्टीम्सच्या मदतीने संशयास्पद हालचाली ओळखून तत्काळ इशारा दिला जाऊ शकतो.

या आधुनिक प्रणालीमुळे पोलिसांचा तपास वेगवान आणि अधिक अचूक होत आहे. मात्र, यात एक नैतिक बाजूसुद्धा आहे - वैयक्तिक गोपनीयता आणि नागरी हक्कांचे रक्षण करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे एआयच्या वापराबाबत योग्य समतोल राखत, त्याचा वापर गुन्हेगारीशी लढण्यासाठी कसा करता येईल, यावर अधिक संशोधन आणि धोरणे विकसित करण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात, जिथे मोठ्या प्रमाणावर डेटा उपलब्ध आहे, तिथे एआय आधारित तपास प्रणालींचा योग्य वापर केला तर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते.

Web Title: Know about How will AI do police work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.