किसान योजनेचे अनुदान आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे; डाटा अपलोड होईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:29 IST2019-03-10T06:28:57+5:302019-03-10T06:29:14+5:30
आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे अनुदान जमा करण्याची सरकारची घाई असली तरी, प्रत्यक्षात किचकट प्रक्रिया पाहता, सर्वच शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी अनुदान मिळेल याविषयी शासकीय पातळीवर साशंकता आहे.

किसान योजनेचे अनुदान आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे; डाटा अपलोड होईना
- श्याम बागूल
नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे अनुदान जमा करण्याची सरकारची घाई असली तरी, प्रत्यक्षात किचकट प्रक्रिया पाहता, सर्वच शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी अनुदान मिळेल याविषयी शासकीय पातळीवर साशंकता आहे.
जिल्ह्यातून २३ हजार शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात माहिती नॅशनल पेमेंट कार्पोरेशन आॅफ इंडियाला पाठविण्यात आली. त्यातील जेमतेम साडेआठ हजार शेतकºयांच्या माहितीची खात्री होऊन खात्यावर पैसे आले. जिल्ह्यात योजनेसाठी तीन लाख ४४ हजार ५७० शेतकरी पात्र ठरविण्यात आले असून, त्यापैकी जवळपास दोन लाख शेतकºयांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. ६० हजारांच्या आसपास शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरा टप्पा मिळणे कठीण
निवडणूक आचारसंहिता केव्हाही जारी होईल, पहिल्या टप्प्यात रक्कम जमा झालेल्या शेतकºयांच्या खात्यावर दुसºया टप्प्यातील रक्कम जमा होऊ शकणार नसल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.