किरीट सोमय्यांची 72 मशिदींच्या लाऊडस्पीकरविरोधात तक्रार; थेट यादीच टाकली, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 15:58 IST2025-04-06T15:57:20+5:302025-04-06T15:58:48+5:30
Masjid Loudspeaker: बांग्लादेशी घुसखोरांसह मशिदीवरील अवैध भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी आक्रमक झाले आहेत.

किरीट सोमय्यांची 72 मशिदींच्या लाऊडस्पीकरविरोधात तक्रार; थेट यादीच टाकली, पाहा...
BJP Leader Kirit Somaiya: गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीतर याविरोधात राज्यभर आंदोलन केले होते. आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या गोवंडी भागातील 72 मशिदींमध्ये बेकायदेशीरपणे लावलेल्या लाऊडस्पीकरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
किरीट सोमय्या यांनी शनिवारी शिवाजी नगर-गोवंडी परिसराला भेट दिल्यानंतर हे पाऊल उचलले. ही बाब गांभीर्याने घेत सोमय्या म्हणाले की, मी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोवंडीतील 72 मशिदींमध्ये पोलिसांच्या परवानगीशिवाय बेकायदा लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. यावर मी अधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस पुढील 72 तासांत कारवाई सुरू करणार आहेत.
72 मशीद/भोंगे शिवाजी नगर गोवंडी मुंबई
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 6, 2025
रोज भोंगे जोरात वाजत आहे...
लाऊडस्पिकरच/भोंग्याची परवानगी एकही मशिदनी घेतलेली नाही
काल शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार केली
उद्या पासून कारवाई होणार
अनधिकृत मस्जिदी/भोंगे यादी
1 अलभदिना मस्जिद व मदरसा आता-ए- रसुल तालीमुल कुराण
2… pic.twitter.com/GAOFQXLYXs
सोमय्या यांनी यापूर्वीही तक्रारी केल्या
किरीट सोमय्या गेल्या अनेक महिन्यांपासून या मुद्द्यावर सक्रिय असून मुंबईतील विविध भागातील मशिदींवरील बेकायदा लाऊडस्पीकरविरोधात मोहीम राबवत आहेत. हे कायद्याचे उल्लंघन तर आहेच, पण त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांनाही त्रास होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. ही समस्या केवळ गोवंडीपुरती मर्यादित नसून मुंबईतील इतर अनेक भागातही अशीच परिस्थिती असल्याचे सोमय्यांनी सांगितले. दरम्यान, सोमय्या यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली असून, त्यात सर्व 72 मशिदींची यादीही टाकली आहे. विशेष म्हणजे, सोमय्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशा तक्रारी केल्या आहेत.
घुसखोरांविरोधात सोमय्या आक्रमक
किरीट सोमय्या गेल्या काही काळापासून सातत्याने सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अवैध बांग्लादेशी घुसखोरांविरोधात तीव्र मोहिम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध शहरांमध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे.