"अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 08:58 AM2021-10-23T08:58:51+5:302021-10-23T08:59:13+5:30

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पोलीस यंत्रणेला सूचना

Keep youth away from drugs work cautiously says dilip walse patil | "अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा"

"अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा"

googlenewsNext

नागपूर : अमली पदार्थाच्या विळख्यात सापडून तरुणाई उद्ध्वस्त होऊ शकते. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी आता नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे, अशी सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी पोलीस दलाला केली.

येथील पोलीस निवासस्थानाचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत आदी उपस्थित होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटनही त्यांनी केले.

सध्या अमली पदार्थाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. त्याला स्पर्श करताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी अमली पदार्थ आणि दुष्परिणामाचे सांकेतिक विश्लेषण केले. दहशतवाद आणि नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागेल. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या अवती-भवतीही  नजर रोखावी लागेल, असे ते 
म्हणाले.

पोलिसांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी १२ हजार पोलिसांच्या भरतीचे उद्दीष्ट सरकार समोर असल्याचे त्यांनी सांगितले.

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू’
महिला अत्याचारासंबंधित शक्ती कायदा विधेयक नागपूर अधिवेशनात संमत करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. संयुक्त निवड समितीच्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे वळसे-पाटील म्हणाले.

...हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान- मुख्यमंत्री ठाकरे
डीएनए विश्लेषण विभागाचे ऑनलाइन उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात अमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रात आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे आणि केंद्रातील तपास युनिटच ते शोधू शकते, असे दाखविले जात आहे. 
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले पण त्यात हिरोईनचा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही. महाराष्ट्र पोलिसांची ख्याती देशभर आहे. त्यामुळेच महाराष्ट्र व महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

Web Title: Keep youth away from drugs work cautiously says dilip walse patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.