'कास पठार'चं संवर्धन करणार, न्यू महाबळेश्वर बनवणार; शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 14:51 IST2022-09-22T14:51:05+5:302022-09-22T14:51:38+5:30
कास पठाराचा वारसा संवर्धन करण्यासाठी या उपाययोजना आखल्या जात आहेत अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

'कास पठार'चं संवर्धन करणार, न्यू महाबळेश्वर बनवणार; शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा
मुंबई - कास पठाराला जागतिक वारसा आहे. स्विझर्रलंडपेक्षाही जास्त सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ आहे. त्याठिकाणी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ई-बस सेवा, बायो-टॉयलेटची सुविधा आणि व्ह्युविंग गॅलरीही तयार करण्यात येणार आहे. स्थानिक रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नवीन महाबळेश्वर बनवण्याचा महाराष्ट्र सरकारने प्लॅन केला आहे त्यात कास पठारचा समावेश आहे अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, कास पठाराचा वारसा संवर्धन करण्यासाठी या उपाययोजना आखल्या जात आहेत. जगातून तसेच देशभरातून पर्यटक तिथे येत असतात. कास पठाराच्या संवर्धनासाठी सरकार जे काही प्रयत्न करतेय त्याचे जतन करण्याचं काम पर्यटकांनी करावं. वन खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, जलसिंचन खात्यासोबत समन्वय साधत कास पठाराच्या विकासासाठी काम करू असं त्यांनी सांगितले.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी समिती
काही दिवसांपूर्वी एक समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटली होती. गड किल्ले हे ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्या संवर्धनासाठी विशेष समिती तयार केली जाईल. पर्यटन विभागाकडून जे काही शक्य आहे ते आम्ही करू अशी ग्वाही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.